सांगली

सांगली : ‘डीजे’चा दणदणाट; ‘डायल 112’!

दिनेश चोरगे

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  गणेशोत्सवात 'डीजे' लावण्यास पोलिसांनी कोणताही विरोध केला नाही. तरीही वेळ व नियमांंच्या आदेशाला कोलदांडा दाखवित मध्यरात्रीपर्यंत मंडळाच्या स्टेजसमोर 'डीजे'च्या सुरू असलेल्या दणदणाटाचा आवाज थेट 'डायल 112' क्रमांकावर खणखणत आहे. 'डीजे'चा आवाज बंद करा, यासाठी जिल्हाभरातून दररोज फोन येत आहेत. पोलिसही दहा मिनिटांत जाऊन मंडळांच्या कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारत आहेत.

मिरजेत तीन संच जप्त

गणेशोत्सवाआधी एक महिना अगोदर पोलिसांनी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यांना शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. 'डीजे'च्या आवाजाची मर्यादा पाळावी; अन्यथा तो जप्त केला जाईल, असा इशाराही दिला होता. तरीही मिरजेत पहिल्याच दिवशी 'डीजे'चा दणदणाट सुरू राहिला होता. त्यावेळी तीन मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 'डीजे' संच जप्त करण्यात आला.

पोलिस दहा मिनिटांत

सांगली, मिरजेसह जिल्ह्यात रात्रीच्यावेळी मंडळांसमोर मोठ्या आवाजात 'डीजे' लाऊन तरुणांचे नृत्य सुरू असते. अगदी दोन-अडीच वाजले तरी आवाज सुरूच असतो. याचा परिसरातील रहिवाशांना त्रास होतो. प्रामुख्याने आजारी, लहान मुले यांनाही खूप त्रास होत असल्याने अनेकजण पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात 'डायल 112' क्रमांकावर फोन करून तक्रार करीत आहेत. विशेष म्हणजे हा 'कॉल' एकाचवेळी सांगली, मुंबई आणि नागपूर येथे जोडला जातो. त्यामुळे पोलिसही तातडीने संबंधित ठिकाणी जाऊन 'डीजे' जप्त करण्याची कारवाई करीत आहेत. 'देखावे पाहताना एकजण तलवार घेऊन फिरत आहे', 'मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी सुरू आहे.' 'डीजे'चा आवाज खूप सुरू आहे', 'मिरवणूक अजूनही सुरू असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे', 'दोन मंडळात वाद सुरू आहे', अश तक्रारी असणारे फोन आले आहेत. याची पोलिसांनी दखल घेतली आहे. काही मंडळाचे स्पिकर बॉक्स व 'डीजे' जप्त केले आहेत.

ध्वनीतीव्रता मापकाकडून तपासणी सुरू

पाचव्या, सातव्यादिवशी सार्वजनिक गणेश मंडळांच्या 'श्रीं'चे विसर्जन झाले. अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांऐवजी 'डीजे'ला पसंती दिली. आवाजाची मर्यादी ओलांडली का नाही, याची पोलिसांनी ध्वनी तीव्रता मापकाकडून तपासणी केली आहे. आता नवव्या व अकराव्यादिवशी तपासणी केली जाणार आहे. ज्या मंडळांनी डेसिबल मर्यादा ओलांडली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

शस्त्रधारी पहारा

गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सांगली, मिरज व कुपवाड शहरातील संवेदनशील भागात तसेच ग्रामीण भागातील काही गावांत शस्त्रधारी पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. दिवसभरही हा पहारा घातला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT