सांगली : गुंतवणूक रकमेला व्याज देण्याच्या आमिषाने सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणार्या एस. एम. ग्लोबल या कंपनीचा प्रमुख मिलिंद गाडवे (वय 35, रा. सांगलीवाडी) याला मंगळवारी अटक करण्यात आली.
गाडवे हा गेल्या आठ दिवसांपासून पुण्यातील येरवडा कारागृहात होता. न्यायालयाच्या आदेशाने सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी त्याचा ताबा घेतला. त्याला घेऊन पथक दुपारी सांगलीत दाखल झाले. दि. 24 ऑगस्ट रोजी त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 92 लाखांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गाडवेविरुद्ध प्रथम पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला गेल्या महिन्यात अटक झाली होती. कोल्हापूर जिल्ह्यातही त्याने अनेकांना गंडा घातला आहे.
पुण्यातून त्याला कुरूंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतले. तिथे आठ दिवस कोठडीतील मुक्काम संपल्यावर त्याची पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. त्याचा ताबा घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे प्रयत्न सुरू होते.
गाडवेने जिल्ह्यात अनेकांना गंडा घातला आहे. फसवणुकीचा आकडा कोटींच्या घरात आहेत. मात्र, आतापर्यंत प्रत्यक्ष केवळ तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. फसगत झालेल्या गुंतवणूकदारांनी तक्रारी देण्यास पुढे यावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले आहे.