सांगली

सांगली : जिवंत व्यक्‍ती मृत दाखवून वारस नोंद

दिनेश चोरगे

ऐतवडे खुर्द; पुढारी वृत्तसेवा :  ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील जिवंत शेतकर्‍याला मृत दाखवून वारस नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार तलाठी कार्यालयात उघडकीस आला. संबंधित शेतकरी वरिष्ठांकडे हेलपाटे मारूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
वर्षभरापूर्वी गावातील शेतकरी शिवाजी पांडुरंग पाटील हे मृत झाले होते. त्याच नावाची दुसरी व्यक्‍ती गावात असून त्यांच्या नावावर 62 गुंठे क्षेत्र आहे. हयात असलेल्या शिवाजी यांचे नाव कमी करून मृत व्यक्‍तीचे वारस त्यांच्या 62 गुंठ्याला लावण्यात आले आहे. त्यामुळे हयात असलेल्या शिवाजी यांचे नाव सातबारा उतार्‍यावरून गायब झाले आहे.

शिवाजी हे गेल्या वर्षभरापासून तलाठी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे जावून चुकीची दुरुस्ती करण्याची मागणी करीत आहेत. परंतु प्रशासनाकडून त्यांची दाद घेतली जात नाही. दोन्ही नावाच्या व्यक्ती एक असल्या तरी शेतीचे गट नंबर वेगवेगळे आहेत. तरीसुद्धा असा प्रकार घडला. याबाबत संबंधित अधिकार्‍यांनी ऑनलाईन दुरुस्ती वेळी चूक झाल्याचे सांगितले आहे. शेतकर्‍यांच्या उतार्‍यावर अनेक चुकीच्या नोंदी होत आहेत. त्याची दुरुस्ती शेतकर्‍यास करणे भाग पडत आहे.

आर्थिक अडचणीने हतबल…

शिवाजी यांची सातबारा उतार्‍यावर शेतीच नसल्याने मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेती उतार्‍यावर दिसत नसल्याने कोणतेही पीक कर्ज अथवा कुठेही कर्ज मिळत नसल्याने प्रशासनाच्या कारभारापुढे तो हतबल ठरला आहे. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात याची तक्रार केली आहे. संबंधित महसूल विभागातील अधिकार्‍याला निलंबित करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

वारस नोंदीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठवला आहे. त्यामुळे वरिष्ठाकडून प्रस्ताव येताच चुकीची दुरुस्ती करू.
– डी. डी. आढारी
तलाठी, ऐतवडे खुर्द

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT