सांगली

सांगली : जिल्ह्यात डासांचा सर्वत्र उच्छाद

मोहन कारंडे

सांगली; पुढारी वृत्तसेवा : पावसाच्या तोंडावर नेहमीप्रमाणे यंदाही डेंग्यू, चिकुनगुनिया अशा साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात डासांचा उच्छाद झाला आहे. परिणामी सांगली, मिरज शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तापाचे रुग्ण वाढले आहेत. तपासण्या कमी होत असल्याने रेकॉर्डवर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी दिसत आहे. मात्र, तपासण्या वाढवल्यास आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दि. 20 पर्यंत महापालिका क्षेत्रात आणि ग्रामीण भागात करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये एकूण 10 रुग्ण डेंग्यूचे आणि 1 रुग्ण चिकुनगुनियाचा आढळून आला आहे. या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागात केवळ 36 रुग्णांच्या सॅम्पलची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये चोपडेवाडीमध्ये 4, कुरळप 2, म्हैसाळ 3 आणि सांगलीतील जामवाडी भागामध्ये 1 अशा 10 रुग्णांचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला आहे.

डेंग्यू हा डासांच्या माध्यमातून पसरणारा विषाणूजन्य रोग आहे. एडीस इजिप्ती या जातीचा डास चावला की डेंग्यू होतो. तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ, उलट्या अशी डेंग्यूची लक्षणे आहेत. डेंग्यूवर वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका आहे. तसेच चिकुनगुनिया हा तापाचा आजार आहे. या आजारामध्ये ताप सुमारे तीन ते चार दिवस असतो. कधीकधी ताप थंडी वाजून येऊ शकतो. तसेच डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, पुरळ येणे अशी लक्षणे आहेत.

गेली काही दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने ठिकठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. याच डबक्यामध्ये डासांची पैदास होत आहे. त्यामुळे चिकुनगुनिया, डेंग्यू, डेंग्यूसदृश्य या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. परिणामी, रुग्णालये फुल्ल झाली आहेत.

SCROLL FOR NEXT