सांगली; पुढारी वृत्तसेवा : सरकारच्या आदेशानुसार अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त 100 रुपयात चार शिधावस्तूंचा संच देण्यात येणार आहे. त्यात अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी 1 किलो रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर पामतेलाचा संच दिला जाणार आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या पिशवीतून या वस्तूचे वाटप होणार होते. मात्र पुरेशा पिशव्या न आल्याने अखेर पिशवीशिवाय वस्तू वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जत, पलूस तालुक्यात या वस्तूचे आजपासून वाटप सुरू झाले.
राज्यात सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने दिवाळीनिमित्त नागरिकांना भेट देण्यासाठी चार वस्तूंचा संच देण्याची घोषणा केली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील 4 लाख 12 हजार 676 लाभार्थ्यांना या वस्तूचा लाभ मिळणार आहे. पात्र रेशनकार्डधारकांना संच प्रतिशिधापत्रिका ई-पॉस प्रणालीव्दारे शंभर रुपये दराने वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यासाठी आवश्यक शिधाजिन्नस संचाची मागणी महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटीव्ह कन्झुमर्स फेडरेशन लिमिटेड (मुंबई) यांच्याकडे सादर केली आहे. त्यानुसार शिधाजिन्नस संच कंत्राटदारांनी संबंधित तालुका गोदामापर्यंत पोहोच करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार कवठेमहांकाळ तालुका वगळता इतरत्र या वस्तू पोहच झाल्या आहेत. मात्र अनेक दुकानात या वस्तू आलेल्या नाहीत. त्याशिवाय पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या पिशवीतून या वस्तूचे वाटप करण्याचे आदेश आहेत. मात्र या पिशव्या न आल्याने वाटप रखडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. दिवाळी सुरू झाली आहे, तरी वस्तू न आल्याने टीका होत होती. या वस्तूबाबत रेशन दुकानदारांच्याकडे विचारणा केली जात आहे. आता प्रशासनाने पिशवी शिवाय वस्तू वाटप सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
सांगली 53 हजार 903, मिरज 47 हजार 291, कवठेमंकाळ 23 हजार 520, जत 51 हजार 254, आटपाडी 23 हजार 265, कडेगाव 25 हजार 558, खानापूर विटा 27 हजार 276, तासगाव 41 हजार 767, पलूस 28 हजार 383, वाळवा 63 हजार 723, शिराळा 26 हजार 736, एकूण 4 लाख 12 हजार 676