सांगली; पुढारी वृत्तसेवा : कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याची अतिरिक्त 80 एकर जमीन विक्री करून कर्ज परतफेडीच्या ऋण वसुली प्राधिकरणाने (डीआरटी) दिलेल्या निर्णयाविरोधात कर्ज वसुली अपीलीय प्राधिकरणाकडे (डीआरटीए) सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोमवारी अपील दाखल केले.
दरम्यान, त्रिस्तरीय करार करण्याबाबत बँकेस दिलेली 15 दिवसाची मुदत आज संपली. त्याबाबतही म्हणने बँकेने सादर केले आहे. कारखान्याने 101 कोटी मार्च 2023 अखेर भरल्यास तडजोडनामा करण्यास बँकेने तयारी दर्शवली आहे. महांकाली कारखान्याकडे बँकेची व्याजासह 140 कोटी थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी बँकेने कारखाना व कारखान्याची जमीन व अन्य मालमत्ता सिक्युरिटायझेशन अॅक्ट अंतर्गत ताब्यात घेतली आहे. त्यानंतर कारखाना विक्रीसाठी तसेच चालविण्यास देण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बँकेनेच हा कारखाना व त्याची मालमत्ता खरेदी केली. दरम्यान, कारखान्याची 80 एकर जागा विक्री करून कर्ज परतफेड करण्याची तयारी कारखान्याने दर्शवली. पण अगोदर थकबाकी भरावी, अशी भूमिका बँकेने घेतली. त्यामुळे कारखान्याने बँकेविरोधात पुणे येथील कर्जवसुली प्राधिकरणाकडे (डीआरटी) याचिका दाखल केली. यावर सुनावणी होवून बँकेने कारखान्याची जमीन विक्री करून तीन वर्षात कर्ज परतफेड करावी, यासाठी त्रिस्तरीय करावा करावा, असे आदेश डीआरटीने दिले होते.
कारखान्याची अतिरिक्त 80 एकर जमीन विक्री करून जिल्हा बँकेचे कर्ज परतफेडीचा प्रस्ताव जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाने फेटाळला आहे. कारखान्याने मार्च 2023 अखेर बँकेची व्याजासह 101 कोटी थकबाकी भरावी, यानंतरच कारखान्यास जमीन विक्रीस परवानगी देण्यात येईल. रक्कम भरल्यानंतर तडजोडनामा करण्याचेही आश्वासन दिले आहे. त्याशिवाय याप्रकरणी कर्ज वसुली अपीलीय प्राधिकरणाकडे (डीआरटीए) अपील करण्याचा निर्णयही घेतला होता. त्यानुसार जिल्हा बँकेने कर्ज वसुली अपीलीय प्राधिकरणाकडे आज अपील दाखल केले.