सांगली : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. आता जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या दि. 18 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, तसे आदेश राज्य निवडणूक विभागाने दिले आहेत. प्रारुप यादीवर दि. 22 पर्यंत हरकती व सूचना दाखल होतील. तर दि. 29 ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणूक पूर्वतयारीला वेग आला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण प्रारूपचा दि. 27 जूनला अंतिम आराखडे प्रसिद्ध झाले. गट, गणानंतर माजी सदस्यांसह इच्छुकांना आरक्षणाचे वेध लागले असताना निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी आरक्षण काढण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सांगली जिल्ह्यात दि. 13 जुलैरोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. तसेच दि. 18 रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व दि. 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या दि. 18 रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर त्या दिवसापासून दि. 22 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. त्यानंतर निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या दि. 29 रोजी अंतिम मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या दि. 8 ऑगस्टरोजी प्रसिद्ध केल्या जातील.
आरक्षण सोडत आणि मतदार याद्यांचा कार्यक्रम निश्चित झाल्याने इच्छुक निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण लवकरच तापणार आहे.