सांगली  
सांगली

सांगली : जि.प.चे 47 मतदारसंघ आरक्षित

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी आरक्षण सोडत गुरुवारी जाहीर करण्यात आली. 68 पैकी 42 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या असून यापैकी 21 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 8 गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले असून यामध्ये महिलांसाठी 4 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ओबीसींसाठी 18 जागा राखीव असून यातील 9 जागा महिलांसाठी राखीव आहेत. सर्व आरक्षणाचा विचार केला, तर 47 जागा आरक्षित झाल्या आहेत. या आरक्षण सोडतीमध्ये अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. काही जणांना पुन्हा लॉटरी लागली आहे.अनेक ठिकाणी जुन्या उमेदवारांना संधीची दारे पुन्हा खुली झाली
आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी महसूलच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण उपस्थित होत्या. रितेश चितरुक या विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठीद्वारे सर्व सोडती काढण्यात आल्या.

यावर्षी जिल्हा परिषदेचे 68 गट आहेत. या सोडतीवेळी 2002, 2007, 2012 आणि 2017 या चार निवडणुकीमधील आरक्षणाचा विचार करण्यात आला. अनुसूचित जातीचे आरक्षण काढताना उतरत्या क्रमाने यापूर्वी ज्या गटामध्ये आरक्षण पडले होते, तो गट वगळण्यात आला. अनुसूचित जाती, ओबीसी आणि सर्वसाधारण अशाप्रकारे आरक्षण काढण्यात आले.

जिल्हा परिषेदेच्या 68 गटापैकी तब्बल 42 मतदारसंघ खुले झाले आहेत. यातील 21 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. 42 मतदारसंघात आरक्षण सोडत काढताना यापूर्वी झालेल्या निवडणुकीत कधीही महिलांसाठी राखीव नव्हते, ते यावेळी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले.

सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणारे मतदारसंघ असे : आटपाडी, उमदी, भाळवणी, लेंगरे, कडेपूर, विसापूर, रेठरेहरणाक्ष, नेर्ले, सागाव, मालगाव, नांद्रे, कसबेडिग्रज, हरिपूर, बेडग, डफळापूर, नागेवाडी, मांजर्डे, भिलवडी, कवलापूर, लेंगरे, दुधोंडी आणि म्हैसाळ.

सर्वसाधारण गट असे : देवराष्ट्रे, चिंचणी, पेठ, कुरळप, कासेगाव, बागणी, वाटेगाव, तडसर आरग, करगणी, कवठेएकंद, मणेराजुरी, ढालगाव, कुंडल, अंकलखोप, वाळेखिंडी, मुचंडी, येळावी, पणुंब्रे तर्फ वारुण, मांगले आणि भोसे हे गट सर्वसाधारण आहेत.

ओबीसींना 18 गटात संधी

ओबीसीसाठी मतदारसंघ आरक्षित करताना यापूर्वी कधीही नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित नसलेल्या मतदारसंघाला प्राधान्य देण्यात आले. अठरा गटापैकी नऊ मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवताना चिठ्ठी टाकून सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये करजगी, बावची, एरंडोली, सावंतपूर, चिकुर्डे, माडग्याळ, कुची, बिळूर, करंजे हे जिल्हा परिषदेचे गट ओबीसी महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. तसेच कवठेपिरान, जाडरबोबलाद, दिघंची, निंबवडे, सावळज वाकुर्डे बुद्रुक, संख, कोकरुड आणि वाळवा हे मतदारसंघ ओबीसी जागांसाठी राखीव झाले आहेत.

'अनुसूचित'साठी 8 गट राखीव

अनुसूचित जातीचे आरक्षण काढताना यापूर्वी ज्या गटामध्ये आरक्षण पडले नव्हते, तो गट वगळून उतरत्या क्रमाने आरक्षण सोडत काढण्यात आली. बुधगाव, रांजणी, खरसुंडी आणि बहादूरवाडी हे गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाले. त्याचबरोबर देशिंग, बोरगाव, शेगाव, वांगी हे जिल्हा परिषदेचे गट अनुसुचित जाती महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे.

आरक्षण सोडतीची शुक्रवारी अधिसूचना जाहीर होणार आहे. तसेच दि. 29 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत हरकती दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या गटाचे आरक्षण सोडतीवर जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीवर हरकती असल्यास संबंधित तहसिलदार कार्यालयात हरकत दाखल करता येणार आहेत, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

आरक्षण सोडतीमध्ये अनेक दिग्गजांचा पत्ता कट

जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीमध्ये माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, शिवाजी डोंगरे, काँग्रेसचे पक्षप्रतोद जितेंद्र पाटील, माजी सभापती प्रमोद शेंडगे, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद अर्जुन पाटील, सुषमा नायकवडी, जगन्‍नाथ नायकवडी, आशा पाटील, अरुण राजमाने, सुरेंद्र वाळवेकर, अरुण बालटे या दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT