इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा जक्राईवाडी (ता. वाळवा) येथे इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिवकालीन शिवराई होन नाणे सापडले. या नाण्यावर पुढील बाजूच्या वर्तुळाकार भागात 'श्री राजा शिव' तर मागील बाजूस 'छत्रपती' अशी अक्षरे कोरलेली आहेत.
जक्राईवाडी परिसरात एका शेतात पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू होते. कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचा इतिहास विभागाचा विद्यार्थी दत्तात्रय दळवी याला एक ऐतिहासिक नाणे सापडले. दळवी याने दीपक गायकवाड, चेतन डोंगरे यांना बरोबर घेऊन हे नाणे इतिहासाचे अभ्यासक प्रा. सचिन गरुड व प्रा. किरण चौगुले यांना दाखविले. त्यांनी हे नाणे शिवकालीन शिवराई होन असल्याचे स्पष्ट केले.
जक्राईवाडी परिसरामध्ये असलेली दगडी चक्रव्यूह रचना या प्राचीन ग्रीक व रोमन व्यापारांच्या महत्त्वाच्या पाऊलखुणा असल्याबाबतचे संशोधन डेक्कन कॉलेजचे पुरातत्त्व शास्त्रचे विद्यार्थी सचिन पाटील यांनी पुरातत्व शाखेचे विभागप्रमुख डॉ. पी. डी. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले होते. दरम्यान, या सापडलेल्या नाण्याला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे प्रा. सचिन गरुड यांनी सांगितले.