सांगली

सांगली : चांदोलीत अतिवृष्टी; जिल्ह्यात संततधार

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा : दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात मंगळवारी मान्सूनचे आगमन झाले. जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले. उर्वरित खरीप पेरणीस वेग येणार आहे. तसेच चांदोली, कोयना धरण परिसरातही अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा गतीने वाढू लागला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्याला पावसाने हुलकावणी दिली. यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला होता. विविध धरणांतील पाणीसाठा पार तळाला गेला होता. यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले होते. पंधरा दिवसांत सिंचनाचे पाणी बंद करण्याची शक्यता होती; परंतु सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात संततधार सुरू झाली आहे. मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती.
शिराळा, वाळवा तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मिरज, सांगली शहरांत दिवसभर संततधार सुरू होती. यामुळे शहरातील गुंठेवारी व सखल भागात पाणी साचले. शहरात रस्त्यांवरही पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मिरज शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. पलूस, कडेगाव, तासगाव तालुक्यात हलका पाऊस पडला. खानापूर, आटपाडी तालुक्यात तुरळक पाऊस पडला.

कवठेमहांकाळ, जत तालुक्यातही ठिकठिकाणी पाऊस पडला. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 51 मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे : मिरज : 8.6 (88.4), जत : 0.1 (95.2), खानापूर-विटा : 11.1 (86.3), वाळवा-इस्लामपूर : 9.3 (79.6), तासगाव : 2.9 (71.9), शिराळा : 51 (195.5), आटपाडी : 0.1 (68.1), कवठेमहांकाळ : 20.6 (79.3), पलूस : 5 (51), कडेगाव : 9 (70.2).

या पावसाने मागील महिन्यात पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच पुरेशी ओल झाल्याने उर्वरित पेरणी आठवडाभरात होणार आहे. नदीकाठी ऊस लावणींना वेग येणार आहे.

याबरोबरच धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. कोयना धरण परिसरात सोमवारी सकाळी आठ ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 24 तासात 74 तर मंगळवारी दिवसभर म्हणजे सायंकाळी पाचवाजेपर्यंत 58 मिमी पाऊस पडला. महाबळेश्‍वर येथे वरीलप्रमाणे अनुक्रमे 129 व 67 मिमी पाऊस झाला. नवजाला वरीलप्रमाणे 118 व 75 मिमी पाऊस पडला. यामुळे कोयना धरणात प्रतिसेंकद सुमारे 15 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. दोन दिवसांत कोयनातील पाणीसाठा पाच टीएमसीने वाढला आहे. या धरणातून सध्या प्रतिसेंकद 1050 क्युसेक पाणी सोडले जात आहे. तसेच धोमला 34 व कण्हेरला 45 मिमी पाऊस पडला. कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणीपातळीत काहीशी वाढ झाली आहे.

नदीकाठ धास्तावला : स्थलांतराची तयारी

धरण परिसरात व जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे धरणांतील पाणीपातळी वाढत आहे. कोकण, चिपळूण, महाडमध्ये पूर आला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नदीकाठीही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साहित्यांची बांधाबांध सुरू केली आहे. पाहुण्यांऐवजी सुरक्षित ठिकाणी खोल्या भाड्याने बुकिंग करण्याकडे लोकांचा कल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT