चरण; बिपिन पाटील : चांदोली परिसरात सध्या पावसाळ्यामुळे धरण, विद्युत निर्मिती प्रकल्प, नयनरम्य परिसर, चांदोली राष्ट्रीय उद्यान, गुढे-पाचगणी थंड हवेचे पठार, परिसरात वाहणारे धबधबे आदी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु म्हणाव्या अशा सेवा-सुविधा येथे नसल्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
शिराळा पश्चिम भागातील चांदोली येथे वारणा नदीवर 1976 मध्ये 34.40 टी.एम.सी. क्षमतेचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मातीचे धरण बांधण्यात आले आहे. अभयारण्यातील जंगल सफारीमध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यानातील जाधववाडी येथील चेक नाक्याजवळील अभयारण्याची स्वागत कमान, जोंधळवाडा येथील गवताळ क्षेत्र, कोणत्याही ठिकाणावरून दृष्टीस पडणारा जनीचा आंबा, बारमाही पाणी व वन्यप्राण्यांची रेलचेल असणारे झोळंबी जंगलातील लपणगृह, झोळंबी येथील विठ्ठलाई मंदिर परिसर, छोटे-मोठे धबधबे हे चांदोली धरण, अभयारण्य व गुढे-पाचगणी पठारावर पर्यटकांना पहावयास मिळत आहे.
चांदोली धरण परिसर निसर्गाने नटलेला असून येथे पर्यटनाला मोठा वाव आहे. त्यादृष्टीने प्रशासनानाकडून पर्यटन विकास झाल्यास येथील लोक छोटे-मोठे व्यवसाय सुरू करू शकतील. बेरोजगारांना हाताला काम उपलब्ध होईल. किंबहुना शिराळा तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपाला येऊन एक वेगळी ओळख निर्माण होईल.
याबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देऊन येथील पर्यटन विकास कामांना गती पाहिजे, अशी प्रतिक्रिया पर्यटकांतून व्यक्त केली जात आहे. गुढे-पाचगणी पठारावरील खोल दर्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही. धरण पायथ्याशी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. जवळील 1 कि.मी अंतरावरील मणदूर गावातून सुविधा उपलब्ध करावी लागते. चांदोली धरण व अभयारण्य परिसर दिसतो. त्या टॉवर परिसरात कोणत्याही प्रकारची सुविधा नाहीत. टॉवरकडे जाताना ही पर्यटकांना तारेवरची कसरत करावी लागते. शेडगेवाडी फाटा ते चांदोली धरण मुख्य रस्त्यांची ही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अरूंद रस्ते, खड्डेमय रस्ते व धोकादायक पूल पर्यटकांना धोकादायक ठरत आहे.