सांगली : पुढारी वृत्तसेवा : येथील सराफ कट्ट्यावरील ओतारी आर्ट या सुवर्ण कारागीराच्या दुकानातील चोरीचा अवघ्या 24 तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी गिरीष उर्फ अतीष मोहिते (वय 23, रा. भूईगल्ली, खणभाग, सांगली) या चोरट्यास
अटक करण्यात आली आहे.
शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या चोरीचा विश्रामबाग पोलिसांनी छडा लावला. मोहिते याने चोरी केल्याची कबुली दिली आहे.
त्याने चोरलेल्या चांदीच्या पादुका व त्याचे कव्हरही जप्त करण्यात यश आले आहे. मोहितेला पुढील तपासासाठी शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
गावभागातील सागर ओतारी यांचा चांदीच्या मूर्ती घडविण्याचा व्यवसाय आहे. सराफ कट्ट्यावर त्यांचे दुकान आहे. दि. 31 ऑक्टोबररोजी दुपारी ओतारी घरी जेवण करण्यासाठी गेले होते. दुकानात त्यांचे वडील होते. तेही काही वेळानंतर दुकानाचे शटर्स अर्धे खाली ओढून लघुशंकेसाठी गेले होते.
दरम्यानच्या काळात चोरट्याने ओतारी यांच्या दुकानात प्रवेश करून चांदीच्या पादुका व त्याचे कव्हर लंपास केले. ओतारी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सीसीटीव्हीचे फुटेज तपासले होते. मात्र हाती काहीच लागले नाही. ही चोरी मोहिते याने केली असून तो विश्रामबाग हद्दीत चांदीच्या पादुका विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. मोहिते हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध सांगली शहर व तासगाव पोलिस ठाण्यात चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.