सांगली

सांगली : घोटाळ्यांचे विषय घुसडून महापालिकेचे केले नुकसान;महापौरांवर भाजपचा आरोप

मोनिका क्षीरसागर

सांगली : पुढारी वृत्तसेवा
सिंधी मार्केेटचे भाडे, बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प, अल-अमीन शिक्षण संस्थेला दंडात सूट देणे आदी विषय महापालिकेच्या महासभेत चर्चेलाही आले नव्हते. मात्र, ऐनवेळच्या विषयात दाखल केल्याचे दाखवून केलेले ठराव घोटाळ्याचे आहेत. महापौरांनी हे विषय इतिवृत्तात घुसडून महापालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे. दोषींविरोधात मोहीम उघडली जाणार आहे. रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई लढली जाणार आहे, असे भाजपचे नेते शेखर इनामदार, सभागृह नेते विनायक सिंहासने, नगरसेवक विवेक कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सोमवारी महासभा आहे. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी महापालिका सभागृहात भाजपची पार्टी मीटिंग झाली. विनायक सिंहासने, शेखर इनामदार, विवेक कांबळे यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. सभेपुढे ऐनवेळचे विषय आहेत का, असा प्रश्‍न नगरसेवकांनी केला. त्यावर ऐनवेळचे दोन विषय असल्याचे नगरसचिवांनी सांगितले. दरम्यान, मागील सभेचे इतिवृत्त वाचण्यास सांगितले असता ते अपूर्ण असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. मागील महासभांचे इतिवृत्त मागवून घेत ते तपासले असता अनेक विषय घुसडून ठराव केल्याचे निदर्शनास आले.

सिंधी मार्केटचे भाडे, बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प व मिरज येथील अल-अमीन शाळेचा दंड माफीस मान्यतेचे विषय ऐनवेळी दाखल केल्याचे दाखवून बेकायदेशीरपणे ठराव घुसडल्याकडे विवेक कांबळे यांनी पत्रकार परिषदेत लक्ष वेधले.

 सिंधी मार्केटला सील ठोका

इनामदार व कांबळे म्हणाले, सिंधी मार्केटमधील 51 दुकानगाळ्यांना सन 2012 ते 2021-22 पर्यंत प्रतिवर्ष 5 हजार रुपये भाडेवाढ आकारणी करून थकबाकी व सेवाकर भरून घेऊन दि. 1 एप्रिल 2022 पासून 29 वर्षे मुदतीने मुदतवाढ देण्यास मान्यता दिल्याचा विषय दि. 20 ऑक्टोबर 2021 च्या महासभेच्या इतिवृत्तात घुसडला आहे. ही भाडेवाढ अतिशय कमी आहे. गाळेधारकांची मुदत दि. 31 मार्च 2012 रोजी संपलेली आहे. त्यामुळे या मार्केटमधील गाळ्यांना सील ठोकावे व विषय रितसर विषयपत्रिकेवर घेऊन महासभेपुढे आणावा व भाडेआकारणी करावी.

नगरसेवक मैनुद्दीन बागवान यांनी दिलेल्या सूचनेवरून कोकण केअर एंटरप्रायझेस यांनी महापालिकेस प्रतिमाह 50 हजार रुपये रॉयल्टी भरून मिरज येथील बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प 15 वर्षे मुदतीने चालविण्यास देण्याचा ठराव केला आहे. ठरावावर सूचक मैनुद्दीन बागवान, अनुमोदक शिवाजी दुर्व आहेत. हा विषयही ऐनवेळच्या विषयात दाखल करून घेऊन ठराव केला. यामध्येही महापालिकेचे आर्थिक नुकसान आहे.

गणेश माळी यांनी दिलेली सूचना सर्वानुमते ऐनवेळच्या विषयात दाखल करून घेतल्याचे दाखवत मिरज येथील अल-अमीन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक इमारतीसाठी बांधकाम परवानगी आणि सामासिक अंतरात सूट देताना दंडाची रक्कम माफ करण्यास मान्यता दिल्याचा ठरावही इतिवृत्तात घुसडला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक मैनुद्दीन बागवान यांच्याशी संबंधित ही संस्था आहे. घुसडलेल्या तीनही विषयांचे ठराव रद्द करावेत यासाठी रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई लढली जाणार असल्याचे, इनामदार, सिंहासने, कांबळे यांनी सांगितले.नगरसचिव हे महापालिका अधिनियमानुसार सभा कामकाज करत नाहीत. त्यांचा पदभार काढावा. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही इनामदार यांनी केली.

तीन सभांचे इतिवृत्त अपूर्ण; रिकाम्या जागेवर रेषा

इनामदार म्हणाले, गेल्या तीन महासभांचे इतिवृत्त अपूर्ण आहे. विषय घुसडण्यासाठी जागा रिकामी सोडलेली आहे. प्रशासनाच्याही दुर्लक्षाची ही बाब गंभीर आहे. रिकाम्या ठेवलेल्या जागेवर आम्ही रेषा मारल्या आहेत.

 सत्तांतरानंतरच्या सभांच्या इतिवृत्ताचे पोस्टमार्टेम

महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतरच्या सर्व महासभांच्या इतिवृत्ताचे पोस्टमार्टेम केले जाणार आहे. घुसडलेल्या विषयांच्या ठरावामागील मास्टरमाईंड शोधला जाणार आहे.

 महासभेचे मिनिटस रेकॉडिर्र्ंग सुरू करा : सिंहासने

महासभेचे मिनिटस् रेकॉर्डिंग करणे बंद केलेले आहे. यापुढे प्रत्येक महासभेचे मिनिटस् रेकॉडिर्ंंग व्हावे. रेकॉर्डिंग सुरू असल्याची खात्री करूनच महासभा सुरू करावी, अशी मागणी सिंहासने यांनी आयुक्‍तांकडे केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT