सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील गुंड सागर तातोबा पारेकर (वय 26, रा. अभिनंदन कॉलनी, संजयनगर, सांगली) याला सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून बुधवारी तडीपार करण्यात आले. मिरजेतील प्रांताधिकार्यांनी ही कारवाई केली.
सागर पारेकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी, गर्दी मारामारी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मार्केट यार्ड, कॉलेज कॉर्नर, संजयनगर परिसरात त्याची प्रचंड दहशत आहे. त्याला कित्येकदा अटक करण्यात आली, पण त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरुच राहिल्या. त्यामुळे विश्रामबाग पोलिसांनी त्याच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन तो प्रांताधिकार्यांना सादर केला होता. सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश प्रांताधिकार्यांनी दिला.