सांगली : पुढारी वृत्तेसवा
कोरोनात जिल्ह्यात दोन हजार 429 महिलांना आपले पती गमवावे लागले. या महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना आत्मनिर्भर व स्वयंमपूर्ण बनविण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचे लाभ देऊन त्यांना दिलासा द्या. यामध्ये अनेक महिला उच्च शिक्षित आहेत. त्यांना रोजगार, स्वयंरोजगार मिळवून पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य करा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी प्रशासनास केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अतिरिक्त मुख्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्हा पुरवठा अधिकारी अशिष बारकुळ उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गोर्हे म्हणाल्या, जिल्ह्यात 5 हजार 608 लोकांचा या साथीत मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या कुुंटुंबीयांना 50 हजारांची मदत शासनाने दिली आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडील 76 हजार 826 कामगारांना 16 कोटी 53 लाख 17 हजार रकमेची मदत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळाकडे नोंद असलेल्या 1 हजार 100 कामगारांना 16 लाख 50 हजार, जिल्हा असंरक्षित माथाडी कामगार मंडळातील 2 हजार 518 कामगारांना 1 कोटी 25 लाख 90 हजार तर जिल्हा सुरक्षा मंडळातील 330 कामगारांना 3 लाख 30 हजार अशी एकूण जिल्ह्यातील 80 हजार 774 कामगारांना 17 कोटी 98 लाख 87 हजार रक्कमेची मदत करण्यात आली.
उपसभापती डॉ. गोर्हे म्हणाल्या, जिल्ह्यात एक पालक मृत्यू कुटुंबांची संख्या 598 तर दोन्ही पालक मृत्यू कुटुंबाची संख्या 18 आहे. तसेच 18 वर्षाच्या आतील दोन्ही पालक मयत असलेली बालके 28 असून 1 पालक मयत बालके 1 हजार 21 आहेत. दोन पालक गमावलेल्या बालकांची संख्या 1 हजार 49 इतकी आहे. या सर्व बालकांना एनसीपीसीआर पोर्टलवर माहिती अद्यावत करण्यात आली आहे. या सर्व कुटुंबियांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे.
त्या म्हणाल्या, ज्या विधवा पदवीधर आहेत, त्यांना प्रशिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी पुढे यावे. कोरोनामध्ये ज्या शेतकरी महिला विधवा झाल्या आहेत, अशा महिलांना कृषी विभागाने बी-बियाणे, खते मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत. एकल महिलांच्या नावावर मालमत्ता करण्यासाठी प्रबोधनपर मोहीम राबवा. जूनमध्ये शाळा सुरु होतात. अशावेळी परिवहन विभागाने स्कूल बसवर नेमण्यात येणारे परिचर यांच्या नियुक्तीबाबत आढावा बैठक घ्यावी. कोरोना काळात ज्या रिक्षा चालकांचे निधन झाले आहे. त्यांच्या रिक्षांचे परवाने मृत व्यक्तीच्या पत्नीच्या नावे तातडीने करुन द्या, अशा सूचना डॉ. गोर्हे यांनी केल्या.