सांगली

सांगली : कुंपणावरील सदस्यांचे ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’

backup backup

सांगली; संजय खंबाळे : जिल्ह्यातील अनेक माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवारात जाण्यासाठी उतावळे झाले होते. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात सुरू असणार्‍या सत्ता नाट्यामुळे जिल्ह्यातील राजकारण जणू 'स्तब्धच' झाले आहे. पक्षातंराच्या कुंपणावर असलेले भाजपचे सदस्य सध्या द्विधा मन:स्थितीत आहेत.

गेल्या पंचावार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपाने कब्जा केला. सुरुवातीला काही वर्ष गुण्यागोविंदाने 'संसार' सुरू होता. मात्र नंतरच्या काळात त्यांच्या कारभाराला स्वकीयांकडून द‍ृष्ट लागली. स्वीय निधीचे वाटप, ऑनलाईन सभा, पदाधिकारी बदल, वॉटर एटीएमचे टेंडर अशा विविध प्रकरणांवरून सत्ताधार्‍यांमध्येच दोन गट पडले. खासदार संजय पाटील हे स्वतः आणि त्यांच्या गटाचे सदस्य पदाधिकारी बदलासाठी आक्रमक झाले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा वाद गेला होता. मात्र अनेक खटाटोपानंतरही त्यांना यश आले नाही.

राजकारणात नेहमी बेरजेचे राजकारण करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याचाच फायदा घेवून जिल्हा परिषदेवर पक्षाचा झेंडा पुन्हा फडकविण्यासाठी चाल खेळण्यास सुरुवात केली. याच खेळीतून भाजपाचे काही नाराज सदस्य राष्ट्रवादीच्या गळाला लागले. अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीच्या सदस्यांबरोबर वाटाघाटी झाल्या. अनेकांना पदांचे अमिष दाखविण्यात आले. गळाला लागलेल्या सदस्यांचा लवकरच पक्ष प्रवेशाचा भरगच्च कार्यक्रम घेण्याचे नियोजनही आखण्यात आले होते, अशी चर्चा आहे.

मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सुरू असणार्‍या सत्तानाट्यामुळे इच्छुकांचा पक्ष प्रवेश थांबला आहे. राज्यात पुन्हा भाजपाचे सरकार आले तर आपली गोची होईल, अशी अनेकांना भीती वाटत आहे. तसेच राज्यात सत्ता आल्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनेक सदस्यांनी सध्या 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे.

परंतु यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे. राज्यात खरेच सत्तांतर झाले तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला विजयासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे.

SCROLL FOR NEXT