सांगली

सांगली : एक (ज) अन्वयेच्या ठरावांवर राष्ट्रवादी गटनेत्याचे प्रश्‍नचिन्ह

दिनेश चोरगे

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  एक (ज) अन्वये आणलेल्या विषयावर महासभेत ठराव मंजूर केले जात आहेत. ही बाब अधिनियमातील तरतुदीला बाधा आणणारी आहे. त्यामुळे कायदेशीर अभिप्राय प्राप्त करून अशा ठरावांची पडताळणी करावी, अशी मागणी महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी आयुक्त यांच्याकडे केली असल्याचे समजते. सांगलीतील शंभरफुटी रस्त्याचा ठराव मंजुरीच्या हालचालीच्या साशंकतेने हे पत्र दिल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील सभा कामकाज प्रकरण 2 मधील खंड 1 (ज) अन्वये महासभेत ठराव पारित केले जात आहेत. वास्तविक कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही सभेत कलम 44 खालील कोणत्याही प्रश्‍नाखेरीज कोणतेही कामकाज पुढे आणण्याची किंवा अशा सभेच्या नोटीसमध्ये पूर्वीच विनिर्दिष्ट करण्यात आला असल्यास असा कोणताही मूळ प्रस्ताव मांडण्याची ज्या कोणत्याही पालिका सदस्यांची इच्छा असेल अशा पालिका सदस्याने प्रस्ताव देण्याबाबत आहे. तथापि या प्रस्तावाच्या अनुषंगाने महासभेत ठराव होत आहेत. ही बाब अधिनियमाच्या तरतुदीस बाधा आणणारी आहे. याबाबत कायदेशीर अभिप्राय प्राप्त करावा. असे ठराव कायदेशीर आहेत, अथवा कसे, याबाबत पडताळणी करावी, अशी मागणी बागवान यांनी पत्राद्वारे केल्याचे समजते.

महापौरांवर गटनेत्यांचा विश्‍वास न्हाय काय?

महापौर राष्ट्रवादीचे आहेत, तरीही राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी आयुक्तांना पत्र दिल्यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज मार्ग (शंभरफुटी रस्ता) मॉडेल रोड म्हणून विकसित करण्यासाठी 76 कोटींचा प्रस्ताव महासभेत 1 (ज) अन्वये आला होता. मिरज आणि कुपवाडमधील रस्त्याचाही समावेश करून एकत्रित विषयपत्र महासभेपुढे ठेवावे, यासाठी मिरज व कुपवाडचे नगरसेवक महासभेत आक्रमक होते. त्यामुळे ठराव होऊ शकला नाही. मात्र हा ठराव मंजूर करून घेण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याचे समजताच मैनुद्दीन बागवान (मिरज) यांनी एक (ज) अन्वये आलेल्या प्रस्तावांवरून कायदेशीर प्रश्‍न उपस्थित केल्याची चर्चा आहे.

SCROLL FOR NEXT