सांगली

सांगली : इस्लामपुरात वृद्धाला साडेचौदा लाखांना गंडा; अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी

दिनेश चोरगे

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा :  अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन इस्लामपूर येथील सेवानिवृत्त वृद्धाला एका महिलेसह तिच्या साथीदाराने साडेचौदा लाखांना गंडा घातला. शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आला. फसवणुकीचा हा प्रकार सप्टेंबर महिन्यात घडला होता. याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात पूजा शर्मा, विक्रम राठोड (पूर्ण नावे माहीत नाहीत) या संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी वृद्धाने फिर्याद दिली आहे.

आरोग्य तपासणी हेल्थ केअर सेंटरमधून बोलत असल्याची बतावणी करून महिलेने व्हिडीओ कॉलिंगद्वारे वृद्धाचे फोटो घेतले होते. त्यानंतर संशयितांनी धमकी देऊन 3 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या कालावधीत वेळोवेळी लाखो रुपयांची रक्कम बँक खात्यावर मागवून घेतली होती.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, 8 सप्टेंबर रोजी संबंधित वृद्धाच्या मोबाईलवर संशयित पूजा शर्मा हिने कॉल केला होता. नंतर दोन, तीन दिवस तिने मेसेज पाठवले. मुंबई येथील हेल्थ केअर सेंटरमध्ये काम करीत आहे, असे तिने सांगितले. व्हिडिओ कॉल करून 'तुमची मेडिकल फाईल आली आहे. तुमची हेल्थ बघून फाईल रिटर्न करायची आहे', असे सांगितले. त्यानंतर व्हिडिओ कॉलवर वृद्धाचे चित्रीकरण केले. त्यानंतर संशयित पूजा हिने तिचे फोटो पाठवले. दोन दिवसांनी पूजा हिने वृद्धाच्या फोनवर त्यांचे अर्धनग्न फोटो पाठवले. फोटो सोशल मीडियावर टाकण्याची त्यांना धमकी दिली.

दि. 19 सप्टेंबर रोजी संशयित विक्रम राठोड याने व्हाट्सअप वरून फोन करून वृद्धाला पोलिस असल्याची बतावणी केली. वृद्धाला 'त्यांचे फोटो इतर राज्यात व्हायरल झाले असून ते थांबवायचे असतील तर खात्यावर पैसे पाठवावे लागतील', असे सांगितले. त्यानंतर वृध्दाने भीतीपोटी 1 लाख रुपये पाठवले. त्यानंतर वेळोवेळी विक्रम याने फोन करून वृध्दाला धमकी दिली. वृद्धाला बँकेच्या वेगवेगळ्या खात्यावर एकूण 14 लाख 40 हजार रूपये पाठवायला सांगून गंडा घातला. याप्रकरणी त्यांनी इस्लामपूर पोलिसात महिलेसह दोघविरूद्ध गुन्हा दाखल केला.

त्या महिलेचा आत्महत्येचा बनाव

विक्रम याने पूजा शर्मा हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फोटो वृद्धाला पाठविले. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी शर्मा हिच्या घरच्यांना 10 लाख रुपये द्यावे लागतील, असा बनाव केला.

SCROLL FOR NEXT