इस्लामपूर; सुनील माने : इस्लामपूर शहरात गांजाची तस्करी जोमात सुरू आहे. परिसरात अनेक तरुण गांजा ओढून नशेच्या आहारी जात आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबे उदध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. शहरातील तरुण पिढीवर कोणाचा वचक नाही. राजकीय वरदहस्त असल्यामुळे या तरूणांना बळ मिळत आहे. हा गांजा नेमका येतो कोठून, त्याला कारणीभूत कोण, असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.
कृष्णा-वारणा नद्यांमुळे वाळवा तालुका हा सुजलाम् सुफलाम् समजला जातो. प्रत्येकाच्या हातात पैसा खेळता असल्याने तरुणाई अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी जात आहे. गुटखा, मावा तर खुलेआम विकला जातोय. ढाबा, हॉटेल गर्दीने फुल्ल असतात. त्यातून दारूचे व्यसनही जडत आहे. यामधून अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. पैशाची चणचण जाणवू लागल्यानंतर हेच तरुण खासगी सावकारीकडे वळत आहेत. खाजगी सावकारांचे अव्वाच्या सव्वा दराने व्याजाने मुद्दल दुप्पट होत आहे. यामधून आत्महत्त्येचे प्रमाणही वाढत आहे. यासाठी पोलिसांनी व्यापक शोधमोहीम राबवून गांजा, गुटखा विक्रीवर बंदी आणावी, तसेच गांजा सप्लाय करणार्या टोळीचा शोध घेऊन तरूण पिढी वाचविण्याची पालकवर्गातून मागणी होत आहे.
आजची तरूण पिढी व्यसनामध्ये गुरफटली जात आहे. अंमली, नशेली पदार्थ तसेच मद्यप्राशन यामुळे अनेकांचे संसार धुळीस लागले आहेत. खून, मारामार्या अशा घटना होण्याला व्यसनच कारणीभूत असते. गांजा हा भयंकर नशिली आहे. बाहेरून शहरात होणार्या गांजाच्या तस्करीचा शोध घेवू. जे तरूण यामध्ये सापडतील त्यांच्यावर कारवाई करून गांजाची पाळे-मुळे शोधून काढू.
-अनिल जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक, इस्लामपूर