सांगली

सांगली : आष्ट्यात सत्ताधार्‍यांना विरोधकांचे तगडे आव्हान

Shambhuraj Pachindre

आष्टा : उत्तम कदम

राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला. यामुळे आष्टा शहरातील सर्वच राजकीय पक्ष, संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. तर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. दरम्यान, सत्ताधारी गटाविरूद्ध भाजप, शिवसेनेसह शहरातील सर्व विरोधकांना एकत्र करून सक्षम पर्याय देण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.

आष्टा नगरपालिकेमध्ये गेल्या 25 वर्षांपासून माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व माजी आमदार स्व. विलासराव शिंदे यांच्या गटाची सत्ता आहे. विरोधात आष्टा शहर लोकशाही आहे. बारा प्रभागातून चोवीस नगरसेवक निवडून येणार आहेत. इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. शहरात मतदार संख्या 29 हजार 467 आहे. निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण व अंतिम मतदार याद्या तयार झाल्या आहेत.

निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. नेते, समर्थक कार्यकर्ते व मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. घराणेशाही, महिला आरक्षण, सर्वच गटातील अंतर्गत मतभेद व नवीन प्रभाग रचना यामुळे अनेक माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांना नगरसेवक पदाची संधी गमवावी लागणार आहे. काही जणांना नव्याने संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातील सत्तांतराचाही या निवडणुकीवर परिणाम होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजपा, डीपीआय व सर्व विरोधकांनी नगरपालिकेतील मनमानीपणाची अनेक प्रकरणे उघडकीस आणून सत्ताधारी गटासमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

SCROLL FOR NEXT