सांगली

सांगली : आष्ट्यात युवकाचा गळा आवळून खून

दिनेश चोरगे

आष्टा; पुढारी वृत्तसेवा :  आष्टा – नागाव रस्त्यावर मंगळवारी (दि. 7) रात्री युवकाचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. शिवाजी आप्पा कुलाळ (35 , मूळ गाव सोन्याळ, ता. जत, सध्या रा. आष्टा – नागाव रोड) असे मृताचे नाव आहे. नवनाथ विठ्ठल ऐवळे (वय 30) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. आठच दिवसात शहरात खुनाची दुसरी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. शिवाजी हा आष्टा – नागाव रस्त्यावरील वन विभागाच्या जागेत झोपडपट्टीत राहत होता. त्याचा उसाचे वाडे विक्रीचा व्यवसाय होता. संशयित नवनाथ हा शिवाजी याच्या शेजारीच राहतो.

मंगळवारी रात्री शिवाजी हा बाहेर जाऊन येतो, असे सांगून मोटारसायकल घेऊन गेला होता. रात्री त्याचा भाऊ विलासने शिवाजीला फोन करून घरी जेवायला येण्यास सांगितले होते. त्यावेळी शिवाजीने "पाचच मिनिटात येतो", असे सांगितले होते. त्यानंतर त्याचा फोनही लागला नाही व रात्री तो घरीही आला नाही. तो उसाच्या वाड्याच्या व्यवसायासाठी गेला असेल, असे समजून घरचे लोक वाट पहात होते.
बुधवारी (दि. 8) सकाळी विलास यांना आष्टा पोलिसांनी फोन करून नागाव रस्त्यावरील माळावर ओघळीत काटेरी झुडपाजवळ मृतदेह मिळाल्याची माहिती दिली. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी त्याला बोलावले. त्याने तो मृतदेह शिवाजीचाच असल्याचे ओळखले. शिवाजीचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट दिसत हाते. तसेच चेहरा, पाठ व कमरेजवळ जखमा होत्या. जवळच त्याची चप्पल पडली होती. नवनाथनेच शिवाजीचा गळा आवळून खून केल्याची फिर्याद विलासने आष्टा पोलिस ठाण्यात दिली आहे.

तू नाद सोड, नाहीतर…

नातेवाईक महिलेबरोबर शिवाजीचे संबंध असल्याचा नवनाथला संशय होता. या विषयावरून आठ दिवसापूर्वी दोघांमध्ये भांडणही झाले होते. 'तू नाद सोड, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही' अशी धमकी नवनाथने दिली होती. त्यावेळी शिवाजीच्या भावाने दोघांचे भांडण सोडविले होते.

SCROLL FOR NEXT