सांगली; पुढारी वृत्तसेवा : गॅस पाईपलाईनसाठी सुरू असलेली रस्ते खोदाई थांबवण्याचे आदेश महासभेने दिले होते. त्यानंतर शहर अभियंता यांनीही लेखी आदेश काढला. तरीही रस्ते खोदाई सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.
आदेशाचे उल्लंघन करून गॅस पाईपलाईनच्या चरीसाठी रस्ते खोदाई केल्याचे आढळल्यास पोलिस कारवाई केली जाईल, असा इशारा शहर अभियंता संजय देसाई यांनी दिला आहे.
गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदाईमुळे पावसाळ्यात रस्ते चिखलमय होत आहेत. वाहने घसरून अपघात होत आहेत. नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. शिवाय संबंधित कंपनीने रस्ता खोदाई भरपाईच्या फरकाचे 17.61 कोटी रुपये महापालिकेकडे भरलेे नाहीत. त्यामुळे गॅस पाईपलाईनसाठी सुरू असलेली रस्ते खोदाई तातडीने थांबवावी. फरकाची रक्कमही वसूल करावी, असा आदेश महापालिकेच्या दि. 20 जून रोजीच्या महासभेत दिला होता.
शहर अभियंता संजय देसाई यांनीही दि. 23 जूनरोजी भारत गॅस रिसोर्सेसच्या व्यवस्थापकांना नोटीस दिलेली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने तसेच रस्ता खोदाईमुळे दुरुस्तीसाठीच्या आकारणी दरातील फरकाची रक्कम अद्याप न भरल्याने रस्त्यावर खोदकाम करू नये, असा आदेश देसाई यांनी दिला होता. तरीही गॅस पाईपलाईनचे काम सुरू असल्याचे समोर आले. अभयनगर, आनंदपार्क, रानडे मळा याठिकाणी गॅस पाईपलाईनसाठी रस्ता खोदून चरी काढण्याचे काम सुरू असल्याकडे नगरसेवक संतोष पाटील यांनी लक्ष वेधले.
महासभा व शहर अभियंत्यांनी रस्ते खोदाई थांबवण्याबाबत आदेश देऊनही अभयनगर, आनंद पार्क, रानडे मळा आदी भागात गॅस पाईपलाईनसाठी रस्ता खोदून चरी काढण्याचे काम सुरू आहे.
– संतोष पाटील, नगरसेवक