सांगली

सांगली : अहिल्यादेवींनी जाती-धर्मात कटुता येऊ दिली नाही

Shambhuraj Pachindre

सांगली : पुढारी वृत्तसेवा

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सामान्य माणसांसाठी राज्य चालवले. घाट बांधले, पाणी, धर्मशाळेची सोय केली; पण यापेक्षाही कितीतरी महत्त्वाच्या बाबी केल्या. इंदूरमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक राहत होते. त्यांच्यात कटुता येणार नाही, एकवाक्यता राहील हा दृष्टिकोन अखंडपणे घेतला, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले.

सांगलीत विजयनगर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण शरद पवार यांच्याहस्ते झाले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, रासपचे नेते महादेव जानकर, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार सुमनताई पाटील, आमदार अनिलराव बाबर, आमदार अरूण लाड, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार सदाशिव पाटील प्रमुख उपस्थित होते.

पवार म्हणाले, अहिल्यादेवी यांच्यासारख्या श्रेष्ठ महिलेचे स्मारक नव्या पिढीला आदर्श देईल. अगदी सामान्य कुटुंबातून येऊन राजकर्त्या बनलेल्या व त्या अधिकाराच्या माध्यमातून गोरगरिबांना आत्मविश्वासाने उभे करण्यासाठी राज्य चालवले, अशा दोन व्यक्ती म्हणजे अहिल्यादेवी होळकर व सयाजीराव गायकवाड होय. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांनी संपूर्ण देशाला दिशा दिली. राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांनी संपूर्ण समाजाला नवी दृष्टी दिली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, धनगर समाजाच्या मागण्यांबाबत आम्ही खोटी आश्वासने देणार नाही. विरोधकांप्रमाणे बनवाबनवीचा कार्यक्रम करणार नाही. धनगर समाजाचे प्रश्न सोडवू. योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही. जयंतराव म्हणाले, अहिल्यादेवी यांच्या स्मारकाचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्तेच व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार धनगर समाजाचे सर्व प्रश्न सोडविणार आहे. डॉ. कदम म्हणाले, सर्व जातीधर्मीयांना बरोबर घेऊन विकास करण्याची भूमिका जिल्ह्याच्या नेतृत्वांनी केली. धनगर समाजाचे प्रश्न सोडवू. आरेवाडीच्या बिरोबा मंदिरासाठी निधी कमी पडून देणार नाही.

अहिल्यादेवी अध्यासन केंद्र

उदय सामंत म्हणाले, सोलापूर विद्यापीठात राजमाता अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र सुरू करू. भरणे म्हणाले, धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देवू. निधी कमी पडू देणार नाही. आरेवाडी येथील बिरोबा देवस्थानला निधी देऊ.

फडणवीस यांनी मारली मेख

अण्णा डांगे म्हणाले, धनगरांच्या एसटी आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांनी टाटा कन्सल्टन्सीचा अहवाल मागवून मेख मारली. हा अहवाल धनगर समाजाच्या विरोधात आहे. महाविकास आघाडी सरकारने धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासह अन्य प्रश्नांची तड लावावी. यशपाल भिंगे यांचे भाषण झाले. प्रास्ताविक नगरसेवक विष्णू माने यांनी केले. आभार महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे यांनी मानले. उपमहापौर उमेश पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, हरिदास पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, बजरंग पाटील, शंभूराज काटकर, नगरसेवक शेडजी मोहिते, मनोज सरगर, अभिजित भोसले तसेच नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवारांनी अनुल्लेखाने मारले; डांगेंनी फटकारले

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पणास विरोध केला होता. दि. 27 रोजी लोकार्पणाचा प्रयत्नही केला होता. त्यामुळे लोकार्पण सोहळा राज्यभर चर्चेत आला. मात्र आजच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी पडळकर यांना अनुल्लेखाने मारले. धनगर समाजाचे नेते माजीमंत्री अण्णा डांगे यांनी मात्र पडळकरांचा उल्लेख विघ्नसंतोषी, नतद्रष्ट असा करून फटकारले. उदय सामंत म्हणाले, भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते; त्याचे काय झाले, याचा जाब पडळकरांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारावा. जानकर म्हणाले, 'आम्हास काही सोडून गेले, पण बाप तो बाप असतो.'

पेशवाईच्या नादाला; खिलार जोड, खट्याळ बैल

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख न करता युवती राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर म्हणाल्या, एका माणसाने कालवा केला. त्याची निंदा केली पाहिजे. पेशवाईच्या नादाला लागून धनगर समाज दावणीला लावण्याचे काम करत आहे. दरम्यान, 'भाजपमधील खिलार जोड', असा उल्लेखही केला. आमदार सदाभाऊ खोत हे खट्याळ बैल आहे, असेही त्या म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT