सांगली; पुढारी वृत्तसेवा : सध्या कृष्णा खोरे पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अजूनही पाच दिवस अतिवृष्टी आहे. त्यामुळे कर्नाटकातील अलमट्टी व हिप्परगी धरणांतून तातडीने पाणी सोडण्यास सुरुवात करावी, अशी मागणी महापूर नियंत्रण समितीने केली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात संघटनेचे विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, संजय कोरे, हणमंतराव पवार, सर्जेराव पाटील यांनी म्हटले आहे की, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात नदी क्षेत्रासह जोरदार पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे महाबळेश्वर व कोयना परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. कृष्णा, वारणा नद्यांची पाणी पातळी वाढत आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीचे पाणी वाढत आहे. सध्या नरसोबावाडी मंदिर येथे पंचगंगा संगमाजवळ पाणीपातळी आठ फुटांनी वाढली आहे. त्यामुळे राजापूर बंधार्याचे पाण्याचा फुगवटा मागे वाढत आहे. सध्या हिप्परगी बॅरेजमध्ये 523 फुटापर्यंत पाणीसाठा झाला आहे. हिप्परगीचे चार दरवाजे उचलले आहेत, पण आता सर्वच दरवाजे उचलावेत. कारण कृष्णा खोरे पाणलोट क्षेत्रात सध्या जास्त पाऊसमान दिसत आहे. सांगली- कोल्हापूर परिसरात पूर येऊ नये म्हणून अलमट्टीतील पाणीसाठा दि. 31 ऑगस्टपर्यंत 512 मीटर ठेवावा, असे ठरले आहे.
त्यामुळे राजापूर बंधारा येथील डिस्चार्जपेक्षा अलमट्टी धरणातून जादा विसर्ग पाणी सोडण्याची गरज आहे. याबाबत तातडीने कार्यवाही, अन्यथा सांगलीत महापूर येण्याची शक्यता आहे.