सांगली

सांगली : अलमट्टीची वाढती उंची राज्यासाठी धोकादायक!

मोहन कारंडे

सांगली : सुनील कदम : अलमट्टी धरणाची उंची 524 मीटरपर्यंत वाढविण्याचे सूतोवाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे. मात्र, ही बाब सांगली आणि कोल्हापूर शहरांसह या दोन जिल्ह्यांतील शेकडो गावांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरणार आहे. अलमट्टीची उंची वाढल्यास कृष्णापंचगंगा काठावरील शेकडो गावांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा धोका आहे. त्याचप्रमाणे या दोन जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

सांगली आणि कोल्हापूर शहराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. इतिहासात या शहरांनी कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचे कित्येक पूर आणि महापूर बघितलेले आहेत. मात्र 2005, 2019 आणि 2021 साली या दोन जिल्ह्यांनी कृष्णापंचगंगा नद्यांच्या महापुराचे जे रौद्ररूप बघितले, तसे यापूर्वी कधीही बघितलेले नव्हते आणि इतिहासातसुद्धा कुठे या भागात इतका प्रलयंकारी महापूर येऊन गेल्याच्या नोंदी नाहीत. मात्र, 2005 साली अलमट्टी धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आणि तेथील पाणी साठवण क्षमता 519 मीटरपर्यंत वाढविल्यानंतरच या भागाला सातत्याने अशा पद्धतीच्या महापुराचा सामना करावा लागत आहे. याचे कारण अलमट्टी धरणाचे बॅकवॉटर हेच आहे, असे अनेकवेळा सप्रमाण सिद्ध झाले आहे. अलमट्टीतून पाणी सोडले की इथला महापूर ओसरतो, हेही स्पष्ट झालेले आहे.

सांगलीत कृष्णा नदीची तळपातळी 527.6 मीटर तर कोल्हापुरात पंचगंगेची तळपातळी 530.18 मीटर इतकी आहे. हिप्परगी धरणाची तळपातळी 510 मीटर, तर महत्तम पाणीसाठा पातळी 516.61 मीटर आहे. पण हे धरण पूर्ण क्षमतेने भरले तरी सांगली, कोल्हापूरला कोणताही धोका जाणवत नाही किंवा तिथंपर्यंत या धरणाचे बॅकवॉटर जात नाही. अलमट्टी धरणाची तळपातळी 498.94 मीटर इतकी आहे. हे धरण जसजसे भरत जाईल, तसतसे त्याचे बॅकवॉटर कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या माध्यमातून सांगली-कोल्हापूरकडे सरकायला सुरुवात होते. अलमट्टी धरण 519 मीटरपर्यंत भरताच सांगलीतील पाण्याची पातळी 527 वरून 546 पर्यंत म्हणजे 19 मीटरने वाढते. याच प्रमाणात कोल्हापुरातील पंचगंगेच्या पाणी पातळीतही 530 वरून 549 मीटरपर्यंत वाढ होणार यात शंकाच नाही. याचाच परिणाम म्हणून 2019 आणि 2021 च्या महापुरावेळी सांगलीत कृष्णेची पातळी 57.6 व 54.6 फुटांवर गेली होती. याच काळात कोल्हापुरात पंचगंगेची पातळी 56.3 आणि 55.7 फुटांवर गेली होती. परिणामी या दोन्ही शहरांतील जवळपास निम्मी नागरी वस्ती पाण्याखाली गेली. शिवाय प्रमुख बाजारपेठांमध्येही पाणी शिरले. याशिवाय या दोन जिल्ह्यांतील कृष्णा-पंचगंगा नदीकाठावरील शेकडो गावे आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती.

अशा परिस्थितीत कर्नाटकने आता अलमट्टी धरणाची उंची आणखी पाच मीटरने म्हणजे 16.5 फुटांनी वाढविण्याचा विचार चालविला आहे. तसे झाल्यास आणि त्यानंतर महापुराची परिस्थिती उद्भवल्यास या दोन जिल्ह्यांतील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची पातळीही त्या प्रमाणात वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे 2019 आणि 2021 च्या महापुरात या दोन शहरांमध्ये आणि जिल्ह्यात जेवढी पाणीपातळी होती, त्यामध्ये किमान 16 फुटांची वाढ होणार. याची नुसती कल्पना केली तरी सहज लक्षात येते की, तशी परिस्थिती निर्माण झाल्यास सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही शहरांतील झाडून सगळ्या नागरी वस्त्या आणि बाजारपेठा महापुराच्या कचाट्यात आल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचप्रमाणे या दोन जिल्ह्यांतील कृष्णा-पंचगंगा नदीकाठावरील शेकडो गावे होत्याची नव्हती होऊन जातील, अशी शक्यता आहे. उद्या कदाचित महापूर आलाच तर या धरणाच्या बॅकवॉटरचा फुगवटा सांगली-कोल्हापूर शहरे आणि शिरोळ व मिरज तालुक्यांतील आजूबाजूच्या गावांमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही. अलमट्टीतून प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याशिवाय हा बॅकवॉटरचा फुगवटा कदापिही कमी होणार नाही. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, अलमट्टीतून प्रचंड मोठ्या म्हणजे किती प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार? तज्ज्ञांच्या मते अशी स्थिती उद्भवल्यास अलमट्टीतून 30 लाख क्युसेकने विसर्ग करावा लागेल. पण अलमट्टी धरणाची सध्याची सर्वाधिक विसर्ग क्षमता 10 लाख क्युसेक आहे.

ही क्षमता आणि 2019 सालासारख्या महापुराची तीव्रता विचारात घेता, अलमट्टीच्या बॅकवाटरचा फुगवटा ओसरायला नव्या उंचीमुळे किमान एक महिना लागेल. या कालावधीत हे बॅकवॉटर शिरलेल्या गावांची वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही; शिवाय अलमट्टीचा फुगवटा न ओसरल्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नद्यांना आलेल्या महापुराच्या पाण्यालाही पुढे चाल न मिळाल्याने या नद्यांचे पाणी बाजूच्या प्रदेशात पसरून जो हाहाकार माजेल आणि अब्जावधी रुपयांचे नुकसान होईल ते वेगळेच. त्यामुळे भविष्यातील हा जलप्रलय रोखण्यासाठी अलमट्टीच्या उंचीला विरोध करावाच लागेल, असा मतप्रवाह या जिल्ह्यांतून तयार होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT