सांगली

सांगली : 78 चालकांच्या नेमणुकीचा तिढा सुटला

Arun Patil

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : कचरा संकलनासाठी खरेदी केलेल्या नवीन 78 वाहनांसाठी कंत्राटी वाहन चालक नेमणुकीचा तिढा अखेर सुटला. यापूर्वी 'एल-2' ला मान्यता दिलेल्या स्थायी समितीने यु टर्न घेत 'एल-1' ला मान्यता दिली. दरम्यान, चरी, पावसाळी मुरूम आणि मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गुन्हा गाजला. मिरजेत पावसाळी पाणी निचर्‍यासाठी 'डीपीआर' तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

महापालिकेत गुरुवारी स्थायी समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी सभापती निरंजन आवटी होते. सदस्य संतोष पाटील, फिरोज पठाण, गजानन आलदर, करण जामदार, मनगू सरगर, जगन्नाथ ठोकळे, संजय यमगर, सविता मदने, सुनंदा राऊत, अनिता वनखंडे, पद्मश्री पाटील, नर्गिस सय्यद, संगीता हारगे, कल्पना कोळेकर, गायत्री कल्लोळी उपस्थित होते.

कचरा संकलनासाठी घंटागाड्यांसह नवीन 78 वाहने खरेदी करण्यात आली आहेत. कंत्राटी वाहन चालक नेमणुकीसाठी निविदा प्रक्रियेस झालेला विलंब, 'एल-1' ऐवजी 'एल-2' निविदेला मान्यतेचा स्थायी समितीने केलेला ठराव व 'एल-1' ने बजावलेली दावापूर्व नोटीस या पार्श्वभूमीवर कंत्राटी वाहन चालक नेमणुकीचा तिढा निर्माण झाला होता. साडेदहा कोटींची वाहने केवळ चालक नेमणुकीअभावी गंज खात उभी होती. अखेर स्थायी समिती सदस्य व 'एल-1' यांच्यातील चर्चेनंतर 'एल-1' निविदेला कामगिरीस मान्यता देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला.

महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8, 9, 10 व 19 मध्ये गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदाई केलेली आहे. नादुरुस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी संबंधित कंपन्यांनी महापालिकेकडे 16.50 कोटी रुपये जमा केले आहेत. मात्र यापैकी बराचसा निधी अन्य कामांवर खर्च केला असून केवळ 1.50 कोटी रुपयेच शिल्लक आहेत. चरी दुरुस्तीवरून नगरसेवक गेले काही महिने आवाज उठवत आहेत. अखेर महापालिका प्रशासनाने चरी दुरुस्तीसाठी 4 कोटींच्या कामांची निविदा काढली आहे. दरम्यान, निविदा प्रक्रिया गतीने राबवून कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी सदस्यांनी केली. चरी दुरुस्तीची कामे व पावसाळी मुरमासाठी सदस्यांनी आग्रही भूमिका घेतली. गुंठेवारी, अविकसित भागात आणखी 40 लाखांचे मुरमीकरण तसेच कुपवाडमधील विस्तारीत भागात 1 कोटींचे मुरमीकरण करण्यात येणार आहे.

मिरजेत रस्त्याकडेला गटारी नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येते. रस्ते खराब होतात. त्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा व्हावा, रस्त्यांची गुणवत्ता टिकावी, यासाठी 'डीपीआर' तयार करण्याचा निर्णय झाला. 'पिनाका'कडून डीपीआर तयार होणार आहे, असे सभापती आवटी यांनी सांगितले.

'शिक्षण'चे कोणीच नाही फिरकले…!

महापालिका शाळांकडे शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत. शाळा व शिक्षणाकडे दुर्लक्ष नको, असे मत सदस्यांनी व्यक्त केले. स्थायी समिती सभेला शिक्षण विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी कोणी उपस्थित नसल्यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली.

डेंग्यूची साथ; करा फवारणी

महापालिका क्षेत्रात ताप रुग्णांची संख्या वाढली आहे. डासांचा उच्छाद वाढला आहे. डेंग्यूची साथ पसरली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने सर्वत्र औषध फवारणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या. महापालिका क्षेत्रात डॉगव्हॅन फिरवा. मोकाट कुत्री पकडून नसबंदी करा, असेही सूचवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT