सांगली : उध्दव पाटील आकाशात काळे ढग जमू लागले अन् पाऊस बरसू लागला की शामरावनगरसह विस्तीर्ण भागातील सुमारे चाळीस हजार नागरिकांच्या उरात धडकी भरते. शंभरफुटी रोडच्या दक्षिणेला धामणी रोड ते काळीवाटपर्यंतच्या परिसरात पावसाचे पाणी साचून राहते. जागोजागी डबकी, तळी निर्माण होतात. निचरा होत नसल्याने आठ-दहा महिने पाणी साचून राहते. नागरिकांना आरोग्यासह अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या विस्तारीत विस्तीर्ण भागाचे दैन्य संपवण्यासाठी 'स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट'चे स्वप्न दाखवण्यात आलेे. मात्र वर्ष सरले तरी अद्याप त्याचा 'डीपीआर'ही तयार होऊ शकलेला नाही.
तुंबलेल्या गटारी, गटारीत काळेमिट्ट पाणी, त्याची पसरलेली दुर्गंधी, ठिकठिकाणी घरालगतच मोकळ्या, सखल भागात कित्येक महिने साचलेले पाणी, त्यामुळे निर्माण झालेली दलदल, साचून राहिल्यामुळे पाण्याला आलेली दुर्गंधी, या पाण्यावर तरारलेल्या पाणवनस्पती हे चित्र शामरावनगरसह विस्तीर्ण भागात पदोपदी नजरेसमोर येते. पावसाळ्यात या भागाचे चित्र अधिकच दयनीय बनलेले असते. या भागातील नागरिक सर्वसामान्य आहेत. तात्पुरती व्यवस्था पाहणे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे जीव मुठीत धरून, जगण्याच्या नानाविध कसरती करत याचठिकाणी त्यांना रहावे लागते.
सर्वेक्षण होऊन वर्ष सरले पावसाच्या पाण्याचा निचरा, सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेने 'स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट'ची घोषणा केली. पालकमंत्री जयंत पाटील यांनीही या भागाला भेट देऊन पाहणी केली. समस्येचे गांभिर्य समजून उमजून घेतले. प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांना निर्देश दिले. महापालिकेने एका कंपनीमार्फत सर्वेक्षण सुरू केले. योजना राबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे आदेश संबंधित कंपनीला दिले. मात्र त्याला आता वर्ष उलटले आहे. पावसाळी पाण्याच्या निचर्याचा 'डीपीआर' अद्याप कागदावरही उतरलेला नाही. तो प्रत्यक्षात केेव्हा उतरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळी पाण्याचा निचरा, सांडपाण्याचा प्रश्न तातडीने सोडविणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र त्यासाठी राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे.
हरिपूर रोड ते संपूर्ण काळीवाट परिसर, कोल्हापूर रोडच्या दोन्हीही बाजू, सुभाषनगर, गंगाधरनगर, आकाशवाणी, कालिका मंदिर परिसर, शामरावनगरपासून खरे क्लब हाऊस या दरम्यान कुंटेमळा, हनुमाननगर, भक्तीनगर, त्रिमूर्ती कॉलनी, रामकृष्ण सोसायटी, विठ्ठलनगर, आप्पासाहेब पाटीलनगर, आण्णा सतगोंडा पाटीलनगर, विनायकनगर, महसूल कॉलनी, महादेव मंदिर कॉलनी, जहीर मस्जिद परिसर, रुक्मिणी नगर, लठ्ठे सोसायटी, खिलारे मंगल कार्यालय हा विस्तीर्ण भाग पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने समस्याग्रस्त झाला आहे.
धामणी रोडवरील हॉटेल आशीर्वाद ते धामणी, अंकली ग्रामपंचायत हद्दीतून पुढे रेल्वे पुलाखालूून इनाम धामणी, जुनी धामणी रस्त्याला क्रॉस करत धामणी-बामणी पुलाखालून कृष्णा नदीला मिळणारा नाला खुला करणे, तो रुंद करणे, या नाल्यावरील अतिक्रमण काढणे अतिशय आवश्यक आहे. कोल्हापूर रोड ते धामणी या दरम्यान पूर्व-पश्चिम भोबे गटार बांधून ती या नाल्याला जोडल्यास शामरावनगरसह विस्तीर्ण भागाचा प्रश्न मिटेल. त्यासाठी अनेक शासकीय कार्यालयांचे उंबरे झिजवले. बराच पाठपुरावा केला. अजूनही सुरू आहे. काळीवाट ते हरिपूर जॅकवेल नाला मुजलेला आहे. कोल्हापूर रोडच्या पश्चिम बाजूला पावसाचे पाणी साचून राहते. सध्या या भागात नागरी वस्ती नसल्याने त्याची तीव्रता जाणवत नाही. मात्र वाढत्या शहरीकरणाबरोबर या भागात वस्ती वाढेल, तेव्हा हा भाग भविष्यातील 'शामरावनगर' असेल. कालिका मंदिर परिसर ते खिलारे मंगल कार्यालय परिसरातील नाला खुला करत गेल्याने या परिसराची समस्या थोडी कमी झाली आहे. धामणी रोडवरील नाला, काळीवाट ते हरिपूर जॅकवेल नाला खुला झाल्यास समस्या सुटेल. – अभिजित भोसले, नगरसेवक
शंभरफुटी रोडच्या दक्षिणेकडे धामणी रोडचा पश्चिम भाग व कोल्हापूर रोडपर्यंत सर्व क्षेत्रामध्ये पडणार्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी अतिशय गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. हे क्षेत्र सुमारे 6.50 चौरस किलोमीटर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने टोटल स्टेशनद्वारे सर्वे करून नैसर्गिक उताराप्रमाणे पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे. या भागातील नागरी वस्ती अतिशय वेगाने वाढत आहे. त्याचे नियोजन न केल्यास भविष्यात भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे सर्व डी. पी. रोडच्या (पोळमळा ते खिलारे मंगल कार्यालय, सिंधी पुरुषार्थ रोड, भंगार बाजार रोड, लठ्ठेनगर रोड) दोन्ही बाजूस पश्चिमेकडे उताराप्रमाणे व 100 फुटी रोडच्या दक्षिण बाजूस धामणी रोडपासून कोल्हापूर रोडपर्यंत मोठ्या आरसीसी गटारी होणे आवश्यक आहे. हे सर्व पाणी कोल्हापूर रोडच्या पूर्व बाजूस वळवून दक्षिणोत्तर मोठी आरसीसी गटारीमधून उदय हॉटेलच्या बाजूच्या नाल्यास जोडून नदीकडे वळवणे गरजेचे आहे. हे नैसर्गिकदृष्ट्या योग्य व कमी खर्चाचे आहे.
– अशोक भिलवडे (इंजिनिअर अँड व्हॅल्युअर्स)