सांगली

विटा : वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्यावर वनविभागाची धाड; एकास अटक

रणजित गायकवाड

विटा : पुढारी वृत्तसेवा

विट्यात ज्योतिषाच्या नावाखाली वन्य प्राण्यांची शिकार आणि तस्करी करणाऱ्या भोंदू बाबावर वनविभागाने छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी शिवाजी दाजी शिंदे (वय ७१) यास अटक केली आहे. विशेष म्हणजे तो एका नामांकित शिक्षण संस्थेचा सेवानिवृत्त शिक्षक आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विट्यातील कदमवाडा परिसरातील शिवशक्ती अपार्टमेंटमध्ये एक ज्योतिषी असून त्याच्याकडे काही वन्यजीव आणि प्राण्यांचे अवयव विक्रीस उपलब्ध आहेत, अशी टीप तालुका वनविभागाला मिळाली. विट्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद कांबळे यांनी तात्काळ जिल्ह्याचे उप वनसंरक्षक विजय माने यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर उपवन संरक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित सादणे, वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद कांबळे आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने येथील शिवशक्ती अपार्टमेंटमधील ज्योतिषाच्या नावा खाली सुरू असलेल्या शिवाजी शिंदे यांच्या उद्योगावर छापा टाकला.

यात शिवाजी शिंदे याच्या कडून इंद्रजाल या वनौषधी, मौल्यवान झाडाचे ७ नग, घोरपड प्राण्याची हात जोडी १ नग, मोर पिसे ६० नग आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. शिवाजी शिंदे याच्यावर शेड्युल्ड अनिमल टाईप -१ मधले प्राण्यांची तस्करी करणे, त्यांची शिकार करणे, त्यास इजा करून, हत्या करून अवयव काढून विकणे अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी संशयित आरोपीवर तीन वर्ष सक्तमजुरी आणि 25 हजार रुपयांचा दंड अशा शिक्षेचे प्रवधान आहे. दरम्यान, ज्योतिषा च्या नावाखाली तंत्र-मंत्र, जादूटोणा करणाऱ्यांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. तसेच जर कोणी ज्योतिषाच्या नावाखाली वन्यजीव बाळगत असेल, त्यांचे अवयव बाळगत अगर विकत असेल, तस्करी करीत असेल तर अशा व्यक्तींच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT