इस्लामपूर ; मारूती पाटील : वाळवा तालुक्यात जिल्हा परिषदेचे 12 पैकी 5 मतदारसंघ खुले झाले आहेत. महाडिक गट, हुतात्मा गट, काँग्रेसचे जितेंद्र पाटील व शिवसेनेचे अभिजित पाटील यांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात आरक्षण पडले आहे. तर राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेले बागणी, कासेगाव, वाटेगाव, कुरळप मतदारसंघ खुले झाले आहेत. आता खुल्या मतदारसंघात उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच असणार आहे.
जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ वाढला आहे. खुल्या 5 मतदारसंघातून विद्यमान सदस्य संभाजी कचरे, संजीवकुमार पाटील यांच्याबरोबरच माजी सदस्य राहुल महाडिक, सम्राट महाडिक, देवराज पाटील, रवींद्र बर्डे, रणजित पाटील यांना पुन्हा जिल्हा परिषदेत जाण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जितेंद्र पाटील, सुषमा नायकवडी, गौरव नायकवडी, अभिजित पाटील यांची जिल्हा परिषदेची संधी हुकणार आहे.
रेठरेहरणाक्ष : जि.प. मतदारसंघावर गेली 15 वर्षे राष्ट्रवादीची सत्ता आहे. येथे सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. राष्ट्रवादीचे धनाजी बिरमुळे हे येथे प्रतिनिधीत्व करीत होते. आता येथे कोणाला उमेदवारी मिळणार, याची उत्सुकता आहे.
बोरगाव : जि. प. मतदारसंघ हा काँगे्रसचा बालेकिल्ला मानला जातो. सलग 15 वर्षे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांची एकहाती सत्ता आहे. मात्र आता या मतदारसंघात अनुसूचित जाती महिला असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनाही सक्षम उमेदवार शोधण्याची वेळ येणार आहे. बोरगाव पंचायत समिती गणात सर्वसाधारण गटासाठी आरक्षण पडले आहे. त्यामुळे जि.प. चे विद्यमान सदस्य जितेंद्र पाटील पंचायत समितीची निवडणूक लढवू शकतात.
नेर्ले : जि.प. मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात पुन्हा एकदा सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. त्यामुळे विद्यमान सदस्या संगीता पाटील यांना पुन्हा संधी उपलब्ध झाली आहे.
कासेगाव : या नव्याने निर्मिती झालेल्या जि.प. मतदारसंघातही राष्टवादीचे वर्चस्व आहे. हा मतदारसंघही आता खुला झाला असल्याने जि.प. चे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांना पुन्हा जि.प. मध्ये जाण्याची संधी मिळणार आहे.
वाटेगाव : जि.प. मतदारसंघाचे नेतृत्व सध्या राष्ट्रवादीच्या संध्या पाटील या करीत आहेत. आता हा मतदारसंघही खुला झाला आहे. येथे राष्ट्रवादीकडून पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र बर्डे, प्रकाश पाटील, हर्षवर्धन पाटील तर विरोधी गटाकडून राहुल पाटील इच्छुक आहेत.
पेठ : मतदारसंघावर महाडिक गटाचे वर्चस्व आहे. चिकुर्डे व बहाद्दूरवाडी गटात आरक्षण पडल्याने फक्तहाच मतदारसंघ खुला राहिला आहे. त्यामुळे राहुल, सम्राट महाडिक किंवा या कुटुंबातील महिला तसेच कामेरीचे जयराज पाटील निवडणूक लढवू शकतात. तर राष्ट्रवादीकडून जि.प. चे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, अतुल पाटील यांची नावे चर्चेत आहेत. कामेरी गण खुला आहे.
वाळवा : मतदारसंघातून हुतात्मा गटाच्या सुषमा नायकवडी प्रतिनिधीत्व करीत आहेत. आता हा मतदारसंघ इतर मागास प्रवर्ग गटासाठी आरक्षित झाला आहे. पंचायत समितीचे दोन्ही गण मात्र खुले असल्याने राष्ट्रवादीचे दिलीप पाटील यांच्या कुटुंबातील कोणीतरी तसेच विद्यमान उपसभापती नेताजी पाटील व हुतात्मा गटाचे गौरव नायकवडी मैदानात येऊ शकतात.
बावची : मतदारसंघात पुन्हा एकदा ना.मा.प्र. महिला हे आरक्षण पडले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विद्यमान सदस्या राजश्री एटम यांना पुन्हा संधी आहे. बावची पंचायत समिती गण मात्र खुला झाल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच असणार आहे.
बागणी : मतदारसंघ पुन्हा एकदा खुला झाला आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादीचे अपक्ष सदस्य संभाजी कचरे, वैभव शिंदे तर विरोधी गटाकडून पुन्हा एकदा संतोष घनवट हे रिंगणात येऊ शकतात.
बहादूरवाडी : या नव्याने निर्मिती झालेल्या मतदारसंघात अनुसूचित जाती पुरुष आरक्षण पडले आहे. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. दोन्ही गटांना उमेदवार शोधण्याचे आव्हान असणार आहे.
चिकुर्डे : मतदारसंघात ना.मा.प्र. महिला आरक्षण आहे. त्यामुळे महाडिक गटाबरोबरच शिवसेनेेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील यांना धक्का बसला आहे. या मतदारसंघात अनेक गावांचा नव्याने समावेश झाल्यामुळे येथील राजकीय समीकरण बदलणार आहेत.
कुरळप : हा नव्याने निर्मिती झालेला मतदारसंघ खुला झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य संजीवकुमार पाटील यांना पुन्हा संधी निर्माण झाली आहे. विरोधकांच्याकडून अशोक पाटील हे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.