सांगली

लडाखमध्ये गोठलेल्या पेंगोंग लेकवर झाली अर्धमॅरेथॉन; गिनीज बुकमध्ये नोंद

अनुराधा कोरवी

सांगली : पुढारी वृत्तसेवा : लडाखमध्ये १४ हजार फूट उंचीवर उणे २० डिग्री तापमानात गोठलेल्या पेंगोंग लेकवर २१ कि.मी. अर्धमॅरेथॉन झाली. जयसिंगपूर (ता. कोल्हापूर) येथील डॉ. भावेश शहा व डॉ. रेश्मा शहा यांनी ही स्पर्धा यशस्वी पूर्ण केली. या स्पर्धेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

भारत चीन सीमेवर ७०० चौरस कि.मी. अशा प्रशस्त हिमालयाच्या पर्वत राशींमध्ये पसरलेल्या पेंगोंग लेकवर ही मॅरेथॉन दि. २० फेब्रुवारी रोजी झाली. या खडतर मॅरेथॉनसाठी देशातून ५० अनुभवी अॅथलिट्सची निवड करण्यात आली होती. सर्व सहभागी खेळाडूंसाठी सहा दिवस आधीपासून लेहमध्ये विविध अक्लीमटीयझेशन योजना आखल्या होत्या. दोनदा विशेष मेडिकल चेकअपद्वारे स्पर्धकांची निवड करण्यात आली.

आव्हानात्मक निसर्ग परिस्थितीमुळे स्पर्धेच्या संपूर्ण मार्गावर मेडिकल सहाय्य, इर्मजन्सी सहाय्य मोबाईल अॅम्ब्युलन्स, भारतीय सैन्य दल मदतीसाठी होते. मॅरेथॉनचा संपूर्ण मार्ग बर्फाच्या योग्य जाडीचा तपासणीनंतर आधोरेखित केला होता.

ऑक्सिजनची कमतरता, कडाक्याची थंडी, वारा, घसरडा बर्फ अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये केवळ नियमित व्यायाम, प्राणायाम यांच्या जोडीने उदात्त मनोबलाने डॉ. शहा दांपत्याने ही मॅरेथॉन पूर्ण केली. ग्लोबल वॉर्मिंग व वातावरणातील बदलाने वितळणाऱ्या बर्फामुळे होणाऱ्या विपरित परिणामांकडे जगाने लक्ष वेधण्यासाठी केंद्रशासन व लडाख शासन यांच्या सहयोगाने एडव्हेंचर स्पोर्ट्स ऑफ लडाख फाऊंडेशनने या मॅरेथॉनचे आयोजन केले होते. डॉ. भावेश शहा व डॉ. रेश्मा शहा यांनी ही स्पर्धा पूर्ण केली.

SCROLL FOR NEXT