इस्लामपूर ; पुढारी वृत्तसेवा : लग्नाचे आमिष दाखवून बस्त्यासाठी आणि दागिन्यांसाठी हजारो रुपयांचा गंडा घालणार्या सातारा येथील पती-पत्नीला इस्लामपूर पोलिसांनी सातारानजीकच्या सैदापूर येथे अटक केली आहे. अतुल धर्मराज जगताप (वय 42) आणि श्वेता अतुल जगताप (36, दोघे रा. सातारा) अशी अटक केलेल्या पती-पत्नींची नावे आहेत.
नवरदेवाच्या घरच्यांकडून सोने, लग्नातील कपडे खरेदीसाठी हे दोघे ऑनलाईन पैसे मागवून घेत. पैसे घेतल्यानंतर श्वेता, अतुल परागंदा व्हायचे. त्यांनी आटपाडी, इस्लामपूर, सांगली परिसरात अनेकांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
ताकारी येथील युवकाला लग्नाचे आमिष दाखवून लग्नाच्या बस्त्यासाठी दि. 10 जुलै रोजी त्यांनी 30 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर पाटील यांनी संशयितांशी संपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता. दिलेला पत्ताही खोटा निघाला. त्यानंतर संबंधितांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात फिर्याद दिली होती.
गतवर्षी संशयित अतुल आणि श्वेता यांनी रेठरेधरण येथील एकाला लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मणिमंगळसुत्रासाठी 33 हजार रुपये घेतले होते. त्या युवकाने इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आटपाडी पोलिस ठाण्यातही या दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे.
संशयित अतुल आणि श्वेता हे दोघे बनावट नावाने लग्नासाठी वृत्तपत्रामध्ये जाहिरात देत. जाहिरातीला प्रतिसाद मिळाल्यानंतर संबंधितांना ते सातार्यातील हॉटेलमध्ये बोलावून घ्यायचे. तेथेच मुलगी म्हणून श्वेता हिला उभे केले जायचे. अतुल हा मुलीचा भाऊ असल्याचे सांगायचा.
मुलगी पसंत पडल्यानंतर मुलाच्या नातेवाईकांबरोबर लग्नातील देण्या-घेण्यासंदर्भात बोलणी व्हायची. नंतर श्वेता, अतुल त्या मुलाशी किंवा त्याच्या घरच्यांशी संपर्क साधून मणीमंगळसूत्र, लग्नाच्या बस्त्यासाठी पैसे मागवून घ्यायचे. त्यासाठी ऑनलाईन अकाऊंट नंबर दिला जायचा.
पैसे मिळाल्यानंतर दोघांचेही फोन नंबर बंद असायचे. मुलाकडील नातेवाईक जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर गेल्यानंतर तो पत्ताही खोटा असल्याचे समजायचे. या दोघांनी सांगली व सातारा जिल्ह्यातही अनेकांना गंडा घातल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.
पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शरद बावडेकर, मीनाक्षी माळी यांच्या पथकाने शनिवारी सैदापूर येथे दोघांना ताब्यात घेतले.