सांगली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले,आपत्तीत मदतीचा हात द्या

Arun Patil

सांगली : पुढारी वृत्तसेवा : आपत्तीच्या काळात निसर्ग सर्वांचीच परीक्षा घेत असतो. या काळात सर्वांनी धैर्याने एकमेकांना मदतीचा हात दिला पाहिजे. केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत. त्यांची अंमलबजावणी शंभर टक्के करा. युवा पिढीने भारत आत्मनिर्भर करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

दीपाली सय्यद – भोसले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सांगली, कोल्हापूर पूरग्रस्त भागातील कुटुंबांतील एक हजार मुलींना 50 हजार रुपयांच्या मुदतठेव प्रमाणपत्रांचा वितरण सोहळा कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे झाला. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री जयंत पाटील, खा. संजय पाटील, खा. धैर्यशील माने, आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष दौलत शितोळे, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, ट्रस्टच्या अध्यक्ष दीपाली सय्यद – भोसले, रूपाली चाकणकर उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, दातृत्व ही भारताची प्राचीन परंपरा आहे. त्याच परंपरेशी नाते सांगणारे दीपाली सय्यद-भोसले यांचे कार्य आहे. आपल्याकडे असणार्‍या साधनसंपत्तीचा उपयोग सर्वांनीच चांगल्या कामासाठी करावा. दीपाली सय्यद-भोसले यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्र सरकारने करावा.

ना. कपिल पाटील म्हणाले, दीपाली सय्यद-भोसले यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांचा हा मार्ग अंधारातून प्रकाशाकडे जाणारा आहे. प्रधानमंत्री आवास घरकूल योजनेमध्ये लक्ष घालू. तसेच आपत्तीग्रस्तांसाठी एनडीआरएफच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात येईल.

जयंत पाटील म्हणाले, दीपाली सय्यद-भोसले यांनी आपत्तीग्रस्तांना केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. किल्ले मच्छिंद्रनाथ गड पर्यटनासाठी विकसित करण्यात येत आहे. त्या ठिकाणी राज्यपाल कोश्यारी यांनी भेट द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली. खा. पाटील व खा. माने यांनी मनोगत व्यक्त केले.

दीपाली सय्यद-भोसले म्हणाल्या, 2019 मध्ये आलेल्या महापुराची पाहणी केल्यानंतर मला अश्रू आवरता आले नाहीत. तेव्हाच ठरविले होते, पूरग्रस्तांसाठी काही तरी केले पाहिजे. पूरग्रस्त एक हजार मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याचा मनोदय केला, तो आज पूर्ण झाला.

कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांनी चित्रफीत संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. मयुरी ढोले, सलोनी लोखंडे, स्वाती कांबळे, सिमरन जमादार, आफरिन जमादार यांना प्रातिनिधिक स्वरूपात मदतीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

'मोदी है तो मुमकिन है…'

ना. कपिल पाटील पूर्वी ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यावेळच्या चांगल्या कार्याचा उल्लेख ना. जयंत पाटील यांनी केला. ते म्हणाले, त्यांच्या कामामुळे ते आमदार, खासदार नक्की बनतील हे त्यावेळीच लक्षात आले होते. त्यांची ही इच्छा पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केली आहे. त्यावर कपिल पाटील म्हणाले, 'मोदी है तो मुमकिन है.'

दीपाली सय्यद यांच्या मतदारसंघाबाबत चर्चा

खा. माने यांनी त्यांच्या भाषणात दीपाली सय्यद यांचा हा मतदारसंघ नसतानासुद्धा त्यांनी पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत दिली आहे. त्या चांगले सामाजिक उपक्रम राबवतात, असा दोन वेळा उल्लेख केला.

तोच संदर्भ देत खा. पाटील म्हणाले, माने यांनी घाबरून जाऊ नये. त्या येथून काही निवडणूक लढवणार नाहीत. त्या केवळ सामाजिक कामासाठी येथे आलेल्या आहेत. त्या शिवसेनेच्याच आहेत. त्यावर माने म्हणाले, त्यांचे आम्ही स्वागत करू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT