देवराष्ट्रे, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे, पण महाराष्ट्राच्या इतिहासाला गालबोट लावण्याचे काम सत्ताधार्यांनी केले आहे. पक्षाच्या विचारधारेवर मतदारांनी मतदान केले असताना राज्यात लग्न एकाशी आणि संसार दुसर्याशी असे राजकारण सुरू आहे, असे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.
देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या विविध योजनेतून तसेच आमदार निधीतून कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी कदम बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, भारती बँकेचे संचालक जितेश कदम, माजी उपसभापती मोहनराव मोरे आदी उपस्थित होते.
नवं सरकार येत आणि जुनी कामे रद्द होतात पण पलूस-कडेगाव मतदार संघातील विकासकामे रद्द करायची महाराष्ट्रात कोणाची हिंम्मत नसल्याचे विश्वजित म्हणाले. देशातील वातावरण बदलत चालले आहे. या बदलाची चुणूक कर्नाटकातील निवडणुकीत जनतेने दाखवून दिली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील सरकार घाबरले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या विचारधारेवर मतदारांनी मतदान केले असताना लग्न एकाशी आणि संसार दुसर्याशी असा प्रकार सुरू आहे.
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, जितेश कदम यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी युवा नेते दिग्विजय कदम, बाजार समितीचे संचालक सुनील जगदाळे, सरपंच निर्मला बोडरे आदी उपस्थित होते.