सांगली

मिरजेतील 18 कामांच्या निविदा गुपचूप

दिनेश चोरगे

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : मिरज येथील प्रभाग क्रमांक 6 मधील 18 कामांची निविदा प्रक्रिया व कामांचा दर्जाची चौकशी होणार आहे. उपायुक्त स्मृती पाटील व शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण ही द्विसदस्सीय समिती चौकशी करणार आहे. त्याबाबतचा आदेश आयुक्त सुनील पवार यांनी काढला आहे. यंत्रणेचा गैरवापर करून गुपचूप निविदा काढल्याची तक्रार दोन नगरसेवकांनी केली होती.

नगरसेवक अतहर नायकवडी व नगरसेविका रजिया काझी यांनी 10 जुलै 2023 रोजी आयुक्त सुनील पवार यांच्याकडे तक्रार केली. प्रभाग समिती क्रमांक चार अंतर्गत प्रभाग क्रमांक 6 मधील सार्वजनिक बांधकाम विभाग जाहीर प्रकटन क्रमांक 5/23-24 (20 जून 2023) मधील कामाबाबत तक्रार केली आहे. निविदा प्रक्रिया गुपचूप करणे, निविदा मॅनेज करणे, अशा तक्रारी आहेत. आयुक्त सुनील पवार यांनी चौकशीसाठी द्विसदस्सीय समिती नियुक्त केली आहे. सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित प्रकरणांत दोषी असणार्‍या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी. शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करावी, असा आदेशही आयुक्तांनी दिला आहे.

तक्रार राजकीय इर्षेतून : बागवान

महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान म्हणाले, प्रभागात मी 1.80 कोटींची कामे केली. त्यांना केवळ 20 लाखांची कामे करता आली. सर्वत्र माझीच कामे झाली आहेत. तक्रारीमागचे दुखणे त्यात आहे. तक्रार राजकीय ईर्षेतून झाली आहे. महापालिका प्रशासनाने जरूर चौकशी करावी.

अजितदादा गट – जयंत पाटील गट पहिली चकमक

तक्रारदार नगरसेवक अतहर नायकवडी हे राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे महापालिकेतील गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्या फंडातून झालेल्या 18 कामांच्या निविदा प्रक्रियेबाबत तक्रार केली आहे. बागवान हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गटाचे आहेत. नायकवडी-बागवान यांच्यातील वाद यापूर्वीचा आहे. पण राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतरची पहिली लेखी तक्रार झाली आहे. दोन गटातील ही पहिली चकमक मानली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT