सांगली

मिरज पश्‍चिम भागात पुराची धास्ती

Shambhuraj Pachindre

कवठेपिरान : पुढारी वृत्तसेवा

गेल्या आठ दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात धुवाँधार पाऊस सुरू आहे. परिणामी वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, मिरज पश्‍चिम भागातील ग्रामस्थ पुराच्या भीतीने धास्तावले आहेत. सन 2019 मध्ये कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, तुंग आदी मिरज पश्‍चिम अनेक गावांतील हजारो एकर क्षेत्रातील खरीप पिके, उसाचे नुकसान झाले होते. शेकडो घरात, गोठ्यात पाणी शिरले होते. यातून मोठे नुकसान झाले होते. आजही पुराचे नाव काढल्यानंतर अनेकांना हानीची धास्ती बसते. आता पुन्हा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. कोथळी – समडोळी, दुधगाव-खोची बंधारा पाण्याखाली गेला आहे. नदीकाठी शेतातही पाणी शिरू लागले आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यदाकदाचित पूर आलाच तर आता होणारे नुकसान न परवडणारे असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

तसेच या भागातील अनेक शेतकरी, गावकरी आपल्या पै-पाहुण्यांकडे आसर्‍याची व्यवस्था करून ठेवत आहेत. जनावरांसाठी पर्यायी व्यवस्था बघण्यात येऊ लागली आहे. मात्र, महापूर आलाच तर चार्‍याचा गंभीर प्रश्‍न उभा राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
आजपर्यंतचा अनुभव पाहता पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढताना बोटीची कमतरता जाणवते. त्यामुळे आतापासून याबाबच व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. या सार्‍याच भागात आता केवळ महापुराचीच चर्चा होऊ लागली असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT