मिरज : मिरज तालुक्यातील चार आश्रमशाळांमध्ये एकूण 485 निवासी विद्यार्थी आहेत. तालुक्यातील बेडग येथे असणार्या आश्रमशाळेकडील दुर्लक्षामुळे वीसहून अधिक निवासी विद्यार्थ्यांना दूषित पाण्यामुळे कावीळ व पोटाचा अन्य त्रास झाला होता. त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
मिरज तालुक्यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक यांच्या अखत्यारीमध्ये चार आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांतील मुलांना मोफत निवास, भोजन, शिक्षण, शालेय साहित्य, गणवेश दिले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये इतके अनुदान या संस्थेकडे दिले जाते. तिरमारे गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ सांगली यांच्या यादवराव वाडेकर प्राथमिक आश्रमशाळा तुंग येथे 64 मुले, 65 मुली अशी एकूण 120 निवासी मुले आहेत. शिराळ्यातील निळकंठेश्वर शिक्षण संस्थेच्या प्राथमिक आश्रमशाळा कसबे डिग्रज येथे 81 मुले, 39 मुली अशी एकूण 120 निवासी मुलांची संख्या आहे. अस्तित्व फाऊंडेशनच्या मिरजेतील इंदिरानगर परिसरातील सद्गुरू प्राथमिक आश्रमशाळेमध्ये 53 मुले आणि 32 मुली असे एकूण 85 निवासी विद्यार्थी आहेत. बेडग येथील श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी समर्थ प्राथमिक आश्रमशाळा येथे 75 मुले, 45 मुली असे एकूण 120 निवासी विद्यार्थी सातवीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. आठवीच्या पुढे या आश्रमशाळेमध्ये 40 विद्यार्थी आहेत.
गेल्या महिन्यामध्ये या बेडगेतील आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना दूषित पाणीपुरवठा झाल्याने ते पाणी पिऊन विद्यार्थ्यांना कावीळ व अन्य त्रास झाला होता. त्यांना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून पाहणी करण्यात आली होती. संबंधित संस्थेचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक यांना शासनाने नोटीस बजावली. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र त्यावर अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून सांगण्यात आले.