मिरज : पुढारी वृत्तसेवा
गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसाने महापालिकेची यंत्रणा उघडी पडली आहे. शहरासह विस्तारीत भागातही चिखलांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही ठिकाणी पाणी साचले होते. पावसाच्या सलामीलाच मिरज हे चिखलमय आणि रस्ते खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांकडून पुन्हा संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
शहराच्या पूर्वेला दिंडीवेस रस्त्यापासून सुभाषनगरपर्यंत, पुढे मालगावच्या हद्दीपर्यंत अनेक भागात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही भागात चांगले रस्ते झाले आहेत. तेथे पणी साचले नाही मात्र काही ठिकाणी पाणी साचले आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्ये अनेक ठिकाणी रस्ते चिखलमय झाले आहेत. बोलवाड रस्त्यावरही काही ठिकाणी चिखल निर्माण झाला आहे. म्हैसाळ वेसपासून पुढे म्हैसाळ वेस झोपडपट्टी, टिंबर एरिया, हिराबाग कॉलनीसह काही भागात पाणी साचून चिखल निर्माण झाला आहे. शास्त्री चौकातही रस्त्याची दैना झाली आहे. कृष्णाघाट रस्त्याच्या बाजूला असलेल्या काही वसाहतीजवळ चिखल आहे. समता नगर, माणिकनगर येथेही चिखलाचे साम्राज्य आहे. काही रस्ते बनले आहेत जेथे रस्ते नाहीत, तेथे त्रास होत आहे. एमआयडीसी रस्त्यावरील व्हिस्परींग वुड्स कॉलनीमध्ये एकही रस्ता झालेला नाही. त्यामुळे सर्व कॉलनीमध्ये चिखल आहे.
या परिसरात राहणार्यांना चिखलातून जावे लागत आहे. एमआयडीसी रस्त्यावर आता खड्डे पडल्याने नागरिकांना त्रास सुरू झाला आहे. गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक रस्ते करण्यात आले आहेत.