सांगली : शशिकांत शिंदे
वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी जिल्ह्यातील 73 हजार 245 वाहनचालकांना 5 कोटी 38 लाख 61 हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या लोकअदालती आणि त्यानंतर सुमारे 1 कोटी रुपये दंडाचा भरणा केला आहे. बाकीच्या सुमारे 50 हजार वाहनधारकांनी दंड न भरल्याने त्यांच्याविरोधात आता न्यायालयात खटला दाखल होण्याची शक्यता आहे.
वाहतुकीस शिस्त लागावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे आदी कारणासाठी वाहतुकीचे नियम करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. अनेक वाहनधारकांच्यावर कारवाई करूनही त्यांच्यात बदल होत नाही. त्यामुळे सरकारने दंडाची रक्कम वाढवली आहे. त्याशिवाय सतत नियमभंग केल्यास काही दिवसांसाठी वाहतूक चालवण्याचा परवानाही स्थगित करण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत आधुनिक तंत्रज्ञान आल्याने जिल्ह्यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनधारकांवर ई-चलन डिव्हाईस मशिनद्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. जिल्ह्यामध्ये दंड न भरलेल्या वाहनधारकांना लोकअदालतीमध्ये दंड भरण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. सुमारे 70 हजारांहून अधिक वाहनधारकांना अशा प्रकारच्या नोटिसा दिल्या होत्या. प्रलंबित दंड न भरल्यास न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी इशारा दिला होता. त्यांना लोकअदालतीमध्ये बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यामध्ये जिल्ह्यातून आलेल्या वाहन धारकांकडून 50 लाख रुपयांचा दंडाचा भरणा झाला. त्यानंतरही काहींनी हा दंड भरला. दंड भरलेल्या वाहनधारकांची आता संभाव्य खटल्यातून मुक्तता झालीआहे. अद्यापही प्रलंबित दंड न भरलेल्या वाहनधारकांची संख्या भरपूर आहे. त्यांच्याकडून जवळपास 4 कोटींहून अधिक रुपयांचा दंड वसूल होणे बाकी आहे. त्यांनी तत्काळ दंड भरावा, अन्यथा त्यांच्यावर थेट न्यायालयात खटले दाखल केले जाणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.
अनेकजण वाहन चालवण्यासाठी दुसर्यास देतात. त्याशिवाय अनेक वाहनांची विक्री झाली आहे; मात्र कागदोपत्री ते हस्तांतर झालेले नाही. त्यांच्याकडून नियमभंग झाल्यानंतर मूळ मालकाच्या मोबाईलवर या नोटिसा आलेल्या आहेत. त्यांना आता हा दंड भरावा लागणार आहे. दंड न भरल्यास न्यायालयात हेलपाटे मारावे लागणार आहेत.
वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यास व दुचाकी वाहनांवर ट्रीपल सीट बसवून वाहन चालवल्यास पहिल्यांदा 500 रुपये दंड आहे. दुसर्यांदा हा गुन्हा केल्यास दीड हजार रुपये दंड आहे. त्यानंतर होणार्या गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये दंड केला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहायक निरीक्षक देशमुख यांनी केले आहे.