इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथील तिघा द्राक्ष बागायतदारांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वाळवा येथील व्यापारी पिता – पुत्रांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वडील नजीर मेहबूब मुजावर, मुलगा जमीर अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापार्यांची नावे आहेत. हा फसवणुकीचा प्रकार एक वर्षापूर्वी घडला होता. या प्रकरणी राहुल रघुनाथ माळी (रा. रेठरेहरणाक्ष) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. 11 मार्च 2021 रोजी जमीर व त्याचे वडील नजीर हे रेठरेहरणाक्ष येथे राहुल माळी यांची द्राक्षबाग बघण्यासाठी गेेेले होते. 2 लाख रुपयांत बागेतील द्राक्षमाल घेण्याचा व्यवहार ठरला होता. त्यानंतर राहुल यांचा चुलत भाऊ प्रवीण माळी यांची बाग 3 लाख रुपयांना ठरली होती. तर दुसरा चुलत भाऊ स्वप्निल माळी याची बाग अडीच लाख रुपयांना ठरली होती.
दि. 12 मार्च ते 17 मार्च या कालावधीत जमीर, नजीर हे वाळवा येथून मजूर घेवून आले व तिघांच्या बागेतील द्राक्ष माल घेवून गेले होते. मालाच्या खरेदीचे तिघांना महाराष्ट्र बँकेचे 5 लाख 30 हजार रुपयांचे धनादेश दिले होते. राहिलेले पैसे रोख देतो, असे नजीर याने सांगितले होते.
द्राक्ष बागायतदार राहुल आणि त्यांचे भाऊ बँकेत धनादेश घेवून गेले त्यावेळी जमीर, नजीर यांच्या खात्यावर पैसे नसल्याचे समजले. त्यांच्याशी संपर्क साधला असता, 'तुमचे पैसे देत नाही, तुम्हाला काही करायचे ते करा', अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर माळी यांनी पैशासाठी तगादा लावला असता जमीर, नजीर हे उडवा उडवीची उत्तरे देवू लागले. राहुल यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.