विटा; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या ऊर्जा खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण नाही, त्यामुळेच ग्रामपंचायतींची नळपाणी पुरवठा खंडित करण्याचे आदेश जारी केले आहेत. उद्या ग्रामस्थ संतप्त होऊन एकत्र आले आणि कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याला सर्वस्वी हेच लोक जबाबदार असतील असा इशारा शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी दिला आहे.
राज्याच्या महाविकास आघाडी सरकारातील सत्ताधारी पक्षांमधील अंतर्गत कलह वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता सत्ताधारी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी काँग्रेसकडे असणाऱ्या ऊर्जा खात्यावर निशाणा साधला आहे.
आमदार बाबर म्हणाले, राज्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या ताब्यातील नळ पाणी पुरवठा योजनांची वीज बिले थकीत आहेत. वास्तविक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायती नळ पाणीपुरवठ्याची बीले गोळा करू शकलेली नाहीत. परिणामी वीज बिलांची रक्कम दिवसेंदिवस थकीत होत चालली आहे. मात्र त्याच वेळी दुसरीकडे लॉकडाऊनमुळे लोकांच्या हाताला काम नाही. उद्योगधंदे बंद पडत आहेत, अशा स्थितीत लोक पिण्याच्या पाण्याची बिले सुद्धा भरण्याच्या येत नाही. इतकी त्यांची आर्थिक अवस्था बिकट झालेली आहे, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, अशा संकटाच्या वेळी लोकांना धीर द्यायचे सोडून ऊर्जा खात्या तील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून लोकांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहेत. थकीत बिलापोटी ग्रामपंचायतींची नळ पाणी पुरवठ्याची कनेक्शन्स तोडण्याचे आदेश जारी केलेले आहेत. त्यामुळे आधीच कोरोना महामारी आणि त्याच्यामुळे उदभवलेल्या परिस्थितीने हैराण झालेल्या लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. लोकांना जग ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा कडून पाणी मिळाले नाही तर ते अन्य ठिकाणाकडून पाणी आणण्यासाठी गर्दी करतील आणि त्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. जर कोरोना ची व्याप्ती वाढून तिसरी लाट आली तर त्याला सर्वस्वी ऊर्जा खात्याचे लोक जबाबदार असतील असा इशाराही आमदार बाबर यांनी दिला आहे.