सांगली : पुढारी वृत्तसेवा दामदुप्पट रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून 92 लाखांचा जिल्ह्यात गंडा घालणार्या एस. एम. ग्लोबल या कंपनीचा प्रमुख मिलिंद बाळासाहेब गाडवे (रा. सांगली) हा पुण्यानंतर आता कुरुंदवाड (ता. शिरोळ) पोलिसांच्या ताब्यात गेला आहे. सांगली पोलिस लवकरच त्याचा ताबा घेणार आहेत. गेल्या आठवड्यात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला सहा दिवस पोलिस कोठडी मिळाली होती. तोपर्यंत सांगलीतही त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडे हा तपास सोपविण्यात आला होता.
पथकाने त्याचा ताबा घेण्यासाठी खूप प्रयत्न केला. पुणे पोलिसांच्या संपर्कात पथक होते. मात्र गाडवेसह त्याचे साथीदार अविनाश पाटील (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ), सूरज प्रकाश चौगुले (विक्रमनगर, इचलकरंजी) यांच्याविरूद्ध कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गाडवे व पाटील हे दोघे पुण्यात अटकेत होते. त्यामुळे कुरुंदवाड पोलिसांनी या दोघांचा न्यायालयाकडून ताबा मागितला. सांगली पोलिसांनीही ताबा घेण्यासाठी अर्ज सादर केला होता. परंतु न्यायालयाने कुरुंदवाड पोलिसांना गाडवे व पाटील यांचा ताबा दिला.
गाडवे याने एस. एम. ग्लोबल कंपनीची सांगलीतून सुरुवात केली. एक वर्षात दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून त्याने फसवणुकीचे जाळे टाकले. अनेकांनी कंपनीत लाखो रुपयांची रक्कम गुंतविली. काही महिने त्याने परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी रक्कम गुंतविली. मात्र प्रत्यक्षात त्याने पुन्हा परवाना दिलाच नाही. त्याच्याकडे पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र तो टाळाटाळ करू लागला. सांगलीतील गाशा गुंडाळून तो गायब झाला. त्यानंतर त्याच्याविरूद्ध तक्रारी दाखल होऊ लागल्या. त्याचा ताबा घेण्यासाठी कुरुंदवाड पोलिसांचा तपास होईपर्यंत सांगली पोलिसांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.