विटा; पुढारी वृत्तसेवा : स्वार्थ आणि सत्तेसाठी पळून जाऊन लपून बसलेल्यांनी टेंभू व विट्याच्या पाण्याच्या नावावर लोकांना बनवू नये, अशी टीका विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांच्यावर केली.
वैभव पाटील म्हणाले, आमदार बाबर यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी मतदारसंघातील तमाम जनतेचा विश्वासघात केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आत्ता शिवसेना या पक्षांचा स्वार्थासाठी पुरेपूर वापर करून घेतला. गेल्या काही वर्षात शिवसेनेबरोबर सत्तेत राहून त्यांचा दुसर्या पक्षाबरोबरचा वावर लोकांपासून लपून राहिलेला नाही. आताही ते पक्ष नेतृत्व व कार्यकर्त्यांशी गद्दारी करून केवळ स्वार्थासाठी पळून केले आहेत. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी या गद्दारीला टेंभू व विट्याच्या पाण्याचे नाव देऊन नेहमीप्रमाणे ते लोकांना बनवत आहेत. लोक आता सुज्ञ झाले आहेत, हे विसरू नका.
ते पुढे म्हणाले, टेंभूचे आजपर्यंत झालेले प्रचंड काम हे गेल्या 25-30 वर्षातील सर्वच आमदार तसेच बाजूच्या मतदारसंघातील आमदार, मंत्रीमहोदय या सर्वांच्या योगदानाने झाले आहे. विद्यमान महाविकास आघाडी सरकार व जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांनी मतदारसंघांतील वंचित गावांचा टेंभूमध्ये समावेश करून मतदारसंघाला न्याय दिला आहे. विट्याच्या पाण्याचे तर त्यांनी नावचं घेऊ नये. कारण, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या प्रयत्नाने विटा शहराची 32 कोटी रुपयांची नवीन पाणी योजना पूर्णत्वाला आली आहे. येणार्या दोन -तीन आठवड्यात ती कार्यान्वित होईल. तसेच शहराची भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त योजना आणि निधी मंजुरीसाठी ना. अजित पवार व ना. जयंत पाटील यांनी मोठे प्रयत्न केले आहेत, करीत आहेत. त्यामुळे फुकटचे श्रेय घेण्यासाठी आणि आपली गद्दारी झाकण्यासाठी टेंभू व विटा शहराच्या पाण्याचा वापर करू नका.