सांगली

चोरीच्या संशयावरून सांगलीत एकास अटक

अनुराधा कोरवी

सांगली : येथील चांदणी चौकात 'रॉयल' बेकरीजवळ चोरीच्या उद्देशाने लपून बसलेल्या अक्षय अण्णासाहेब पुजारी (वय 24, रा. चंदूर, ता. हातकणंगले) याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. सोमवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. पुजारी हा सध्या कुपवाड रस्त्यावर लक्ष्मी मंदिरजवळ एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने खोली घेऊन राहतो.

विश्रामबाग पोलिसांचे पथक सोमवारी रात्री गस्त घालत होते. चांदणी चौकात पथक आल्यानंतर त्यांना रॉयल बेकरीच्या पोर्चमध्ये कोणी तरी लपून बसल्याचे निदर्शनास आले. पथकाला पाहून पुजारी याने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्याला पकडण्यात आले. पुजारीची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे एक स्क्रू-ड्रायव्हर व दोन चाव्या सापडल्या.

कदाचित चौकात कोणते तरी दुकान फोडून चोरी करण्याचा त्यांचा उद्देश असण्याची शक्यता आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार भालचंद्र चव्हाण यांनी फिर्याद दाखल केली आहे.

SCROLL FOR NEXT