सांगली

सांगली : गाढवांची तस्करी : 67 टक्यांनी संख्या घटली

backup backup

सांगली : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात सातत्याने गाढवांची संख्या कमी होत आहे. गाढव चोरीच्या घटना वाढत आहेत. प्रामुख्याने औषधनिर्मिती, उत्तेजना वाढवण्यासाठी गाढवांची तस्करी होत असल्याची चर्चा आहे. यासाठी राज्य, आंतरराष्ट्रीय तस्करी करणारे रॅकेट असल्याचे बोलले जाते. खरे तर गाढव हा मेहनती, निमूट काम करणारा प्राणी होय. मंगोलिया, तिबेट, सिरिया, उत्तर आफ्रिका खंडाच्या पूर्व, उत्तर भागात गाढवे आढळतात. मानक, लघू, मॅमथ, बुरो या गाढवांच्या जाती होत. गाढव गवत, झुडुपांवर उपजीविका करते. तर आयुष्यमान 25 ते 45 वर्षे असते. पंधरा हजारांपासून ते तीस हजार रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. जेजुरी येथे होणार्‍या यात्रेत गाढवांची खरेदी – विक्री मोठी होते.

गुजरातमध्ये गाढवांचा मोठा बाजार भरतो. येथून गाढवे जिल्ह्यात आणली जातात. गाढवांचा व्यवसाय करून अनेक कुटुंबे गुजराण करतात. कर्ज काढून काहींनी गाढव खरेदी केली आहेत. वीट भट्टीवर वीट, माती, वाळू वाहतुकीसाठी गाढवांचा वापर केला जातो. गाढवीचे दूध लहान मुलांसाठी गुणकारी मानले जाते. रोज दोन चमचा असे तीन दिवसांचे 500 रुपयेप्रमाणे दुधाची विक्री होते. आंध्रप्रदेशामध्ये मांसासाठी गाढवे चोरीस होण्याच्या घटना होत होत्या. रक्तस्राव, चक्कर, निद्रानाश, कोरडा खोकला तसेच स्त्रीविषयक आजारांविषयी औषधे तयार करण्यासाठी कातडीचा वापर केला जातो. उत्तेजना वाढवण्यासाठी मांस गुणकारी असल्याची काहींची धारणा आहे.

जिल्ह्यात पाच हजार गाढवे

प्रथमत: उत्तरप्रदेशमधून गाढव चोरीच्या घटना समोर आल्या. नंतर गुजरात, राजस्थान, महाराष्ट्रातून तस्करी होत आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी जिल्ह्यात सुमारे 14 ते 15 हजारांच्या घरात गाढव होते. आता हाच आकडा 4 ते 5 हजार इतका झाला आहे. काही व्यावसायिकांनी याला दुजोरा दिला. जिल्ह्यात जवळपास 67 टक्क्यांनी गाढवांची संख्या घटली आहे. येथून गाढव चोरी करून थेट चीनमध्ये लाखो रुपये किमतीला गाढवांची विक्री केली जाते. प्रामुख्याने हैदराबाद हे तस्करांचे केंद्र असल्याचे बोलले जाते. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनीच याकडे आता लक्ष घालण्याची मागणी होत आहे. दरम्यान, गाढवांचा गर्भधारणेचा कालावधी 12 महिने असतो. एकावेळी एकच पिलू होते. शिंगरू सहा महिन्यांपर्यंत स्तनपान करते. गाढवांची पैदास वाढवण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करण्यांची गरज आहे.

गाढवांच्या तस्करी बद्दल काही माहिती नाही. मात्र पैदास वाढण्यासाठी यांचे संगोपन करणार्‍यांनी गाढवांची योग्य निगा राखण्याची गरज आहे. केवळ काम करून न घेता त्यांना वेळेच्यावेळी चारा खाऊ घालावा.
– डॉ. किरण पराग
पशुवैद्यकीय अधिकारी, जि. प. सांगली

SCROLL FOR NEXT