सांगली

कृष्णाकाठी संततधार; नदीकाठाला महापुराची धास्ती, थंडीची लाट

मोहन कारंडे

पलूस; पुढारी वृत्तसेवा : पलूस तालुक्यातील कृष्णाकाठ परिसरात तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीकाठाला महापुराची धास्ती आहे.

संततधार पावसामुळे तापमानाचा पारा 20 सेल्सिअसच्या खाली आला आहे. त्यामुळे दोन दिवस कृष्णाकाठच्या गावामध्ये थंडी जाणवत आहे. त्यामुळे नागरिक घरीच राहणे पसंत करत आहेत. संततधार पावसामुळे शिवारातील अनेक रस्ते चिखलमय झाले आहेत. गेला महिनाभर पाऊस नसल्याने कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकरी चिंतेत होते. जूनअखेर खरीप हंगामीतील पेरण्या, ऊस लागणी खोळंबल्या होत्या. मात्र, दोन दिवसांपासून बरसणार्‍या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. खोळंबलेली लागण, पेरणीचे कामे पूर्ण करण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू आहे. लावणी व टोकणीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. सध्या कोयना धरणातील पाणीसाठा 28.53 टीएमसी म्हणजे (27.11 टक्के) आहे. धरणात पाण्याची प्रतिसेंकद आवक 38 हजार 194 क्युसेक होत आहे. विसर्ग बंद आहे, पण नदी दुथडी भरून वाहत आहे. महापूर येणार काय, याची चर्चा नदीकाठी सुरू आहे.

SCROLL FOR NEXT