करमाळे गावात पाणी टंचाई 
सांगली

करमाळे गावावर पाणी टंचाईचे संकट

पाणी पातळी खालावल्याने परिस्थिती

पुढारी वृत्तसेवा

शिराळा शहर : करमाळे (ता. शिराळा) येथील गावाला सद्यस्थितीत पाणी टंचाई जाणवू लागली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तलावाचे काम करणार्‍या ठेकेदाराने तलावात खोदलेल्या कूपनलिकेचे पाणी गावाला पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीत सोडले होते, परंतु पाणी पातळीच खालावल्याने पाणी टंचाईचे सावट अधिक गडद होत आहे.

करमाळे गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीचा मुख्य पाण्याचा स्रोत असलेला करमाळे तलावाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे तलावाची पाणी पातळी घटल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गावची पाणी पुरवठा यंत्रणा ठप्प होऊ लागल्याने गावाला टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावाच्या पश्चिमेला असणार्‍या तलाव नंबर 1 च्या खालच्या बाजूला असलेल्या, विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. संबंधित तलावातूनच पाझर होऊन विहिरीमध्ये पाणीसाठा होतो. सध्या विहिरीमध्ये पाणी येण्यासाठी तलावातील पाण्याचा पाझर हाच मुख्य स्रोत आहे. तलावाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्यासाठी तलावाची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या वर्षी पावसाळ्यात तलावात 40 टक्के पाणीसाठा झाला होता. आता पाणी पातळी घटल्याने तलाव पूर्णपणे कोरडा पडू लागला आहे.

पाणीटंचाईमुळे एका गल्लीला आठवड्यातून एकवेळ पाण्याचे नियोजन करून, थोडा थोडा पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यापुढे तेही शक्य होणार नाही, असे चित्र आहे. ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी तलावाचे काम करणार्‍या ठेकेदाराने तलावात काही दिवसांपूर्वी कूपनलिका खोदली होती. परंतु विहिरीच्या पाण्याची पातळी खालावू लागल्याने पाणीटंचाई अधिक तीव्र होत आहे.

कूपनलिकेचे पाणी गावाला पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीत सोडले जात होते. परंतु पाणीपातळी खालावल्याने आम्ही प्रशासनाकडे टँकरची मागणी करणार आहे. सद्यस्थितीत गावाचा पाणीपुरवठा दहा दिवसातून एका गल्लीला असा होणार आहे. पाणीप्रश्न निकाली निघावा, हीच भावना आहे.
सचिन पाटील, करमाळे, लोकनियुक्त सरपंच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT