मिरज; पुढारी वृत्तसेवा : ऑनलाईन तलवार मागविणार्या मिरजेतील एका तरुणाला चांगलेच महागात पडले. तलवार घरी पोहोच होताच थेट पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली. जैनुद्दीन सादाद शरीकमसलत (30, रा. मुजावर गल्ली, मिरज) असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जैनुद्दीन शरीकमसलत याने सुमार तीन फूट लांब तलवार ऑनलाईन खरेदी केली होती. ही तलवार कुरियअर मार्फत शरीकमसलत याला पोहोच झाली होती. परंतु कुरियरमध्ये तलवार असल्याचा संशय आल्याने कुरियर बॉयने पोलिसांना याबाबत खबर दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने शरीकमसलत याच्यावर छापा टाकून अडीच हजार रुपये किंमतीच्या तलवारीसह त्याला अटक केली. परंतु लग्न कार्यासाठी तलवार मागविली असल्याचा बनाव शरीकमसलत याने केला. परंतु दहशतीच्या उद्देशाने तलवार आणली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर प्रकरण मिटविण्यासाठी शरीकमसलत याने माजी महापौरासह एका क्लब चालकाला मध्यस्थीचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी कठोर भूमिका घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.