सांगली

एकही गाव राहणार नाही पाण्यापासून वंचित : जयंत पाटील

निलेश पोतदार

विटा : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील कोणतेही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, असा प्रयत्न करू, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेला आज विटा शहरापासून सुरुवात झाली. यावेळी आमदार सुमनताई पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, वैभव पाटील, माजी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, किसनराव जानकर, हणमंतराव देशमुख, रावसाहेब पाटील, सादिक खाटीक आदी उपस्थित होते.

यावेळी ना. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील जलसंपदा मंत्री आहे, त्यामुळे साहजिकच लोकांच्या अपेक्षा आहेत. टेंभू, म्हैसाळचा दुसरा टप्पा या योजनांना जादा पाणी उपलब्ध करून जिल्ह्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, असा प्रयत्न करू.

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ना. पाटील म्हणाले, काळाप्रमाणे निवडणूक तंत्रही बदलले आहे, त्यामुळे नव्या काळाशी सुसंगत प्रचार यंत्रणा वापरावी. पूर्वी एखाद्या गावात, एखाद्या कार्यकर्त्याला निरोप दिला तर चालत होता. त्यानंतर एकेका गटाला वेगवेगळे निरोप द्यावे लागत. अलीकडच्या काळात समाजमाध्यम आणि इतर गोष्टींमुळे व्यक्ती टू व्यक्ती प्रचाराची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक बूथ कमिटीतील कार्यकर्त्याने व्यक्तिशः पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.

माजी आमदार सदाशिवराव पाटील म्हणाले, पक्ष बांधणी मजबूत होणे गरजेची आहे. सध्याचे राजकारण कधी नव्हते इतक्या अतिशय खालच्या स्तराला पोहोचलेले आहे.

माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले, खानापूर मतदारसंघामध्ये 2024 चा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच झाला पाहिजे. याबाबत महाविकास आघाडी म्हणून तुमचे काय ठरले आहे ते एकदा स्पष्टपणे कार्यकर्त्यांच्या पुढे सांगितले पाहिजे. आमची निवडणूक लढवण्याची नव्हे तर जिंकण्याची तयारी पूर्ण झालेली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करतो 

विटा नगरपालिकेचा देशात पहिला नंबर आलेला आहे. याची सरकारकडून दखल घेतली नाही. याबाबत माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्तकेली. त्यावर ना. पाटील यांनी माजी नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील आणि वैभव पाटील यांना मुंबईला या, तेथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करतो, असे म्हणत समजूत काढली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT