इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : इस्लामपूर शहरात काँग्रेस पक्षाची बांधणी सुरू केली आहे. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. इस्लामपूर पालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा निर्धार काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी येथील पत्रकार बैठकीत व्यक्त केला.
यावेळी प्रदेश काँग्रेसच्या अॅड. मनीषा रोटे, अॅड. आर. आर. पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजेंद्र शिंदे, उपाध्यक्ष अॅड. आकिब जमादार उपस्थित होते.
अॅड. रोटे म्हणाल्या, शहराला काँग्रेसची विचारधारा आहे. पक्षाचे निर्णय हे पक्षपातळीवर ठरवले जातात. शहरातील निर्णय हे शहर ब्लॉक कमिटी घेत असते. प्रदेशच्या कोणत्याही पदाधिकार्याला शहरातील निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेस पक्षात नाही. अॅड. जमादार म्हणाले, इस्लामपूर शहरात युवक काँग्रेसची मोठ्या प्रमाणात बांधणी सुरू आहे. पालिका निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र पॅनेल करून पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करणार आहे. पक्षाच्या बांधणीला प्रतिसाद मिळत आहे. आ. डॉ. विश्वजित कदम यांनी शहर काँग्रेसला पूर्ण ताकद देण्याचे आश्वासन दिले आहे.
अॅड. आर. आर. पाटील म्हणाले, 1978 पासून शहरात काँग्रेसने ब्लॉक कमिटी स्थापन केली आहे. त्यामुळे शहरातील कोणतेही निर्णय घेण्याचा अधिकार फक्त या कमिटीला आहे.
घरपट्टी, पाणीपट्टी माफीची घोषणा अधिकृत नव्हे
राजेंद्र शिंदे म्हणाले, इस्लामपूर पालिकेची निवडणूक जाहीर नसताना घरपट्टी, पाणीपट्टी माफ करतो, असे आश्वासन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांनी दिले आहे. हे आश्वासन काँग्रेसची अधिकृत घोषणा नाही. तसेच त्यांना हे आश्वासन देण्याचा अधिकारच नाही. पक्षाच्या धोरणानुसार निर्णयाचे अधिकार स्थानिक पदाधिकार्यांकडे आहेत.