सांगली

आष्टा येथे पेट्रोल टँकरला आग

Arun Patil

आष्टा ; पुढारी वृत्तसेवा : येथील पोलिस ठाण्यासमोर सोमवारी दुपारी चालत्या टँकरमध्ये इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट होऊन केबिनने पेट घेतला. आष्टा व इस्लामपूर नगरपालिका, सांगली महानगरपालिका व हुतात्मा साखर कारखान्याच्या अग्‍निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, टँकरचालक संजय तानाजी खोत (रा. विकासवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) हा हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन (हजारवाडी, ता. पलूस) येथून टँकरमध्ये (एम.एच. 09 एच 7176) दहा हजार लिटर पेट्रोल व दहा हजार लिटर डिझेल घेऊन कोल्हापूरला निघाला होता.

चालत्या टँकरमध्ये इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट होऊन केबिनने पेट घेतला. चालक खोत यांनी प्रसंगावधान राखून टँकर रस्त्याकडेला उभा केला. डीसीपी फायर सिलेंडर फोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आष्टा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित सिद व पोलिसांनी तत्परतेने ही माहिती अग्निशामक विभागांना दिली. परिसरातील दुकाने, हॉटेल, चहाटपर्‍या बंद केल्या. तेथील गॅस सिलिंडर व लोकांना सुरक्षितस्थळी हलविले. या रस्त्यावरील सर्व वाहतूक थांबविली.

अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी चारी बाजूंनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. पोलिसांची सतर्कता, धाडस व तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला.

महापालिकेच्या अग्‍निशमन दलाची धाडसी कामगिरी

सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार आणि टीम अवघ्या 15 मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. जवानांनी आग नियंत्रणात आणली. त्यांना आष्टा, इस्लामपूर पालिका आणि हुतात्मा कारखान्याच्या अग्निशमन बंबांनीही आग आटोक्यात आणण्यास मदत केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT